यवतमाळ : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहन दिले जाते. असा विवाह करणाऱ्या दाम्पत्याला ठरावीक रक्कम अनुदान म्हणून दिली जाते. यासाठी समाजकल्याण विभागाने जाहिरात करून प्रस्ताव मागितले होते. मात्र, अजूनही अनुदानाचे वाटप करण्यात आले नाही. या अनुदानासाठी युवक काँग्रेसच्या नेतृत्वात लाभार्थ्यांनी सोमवारी दुपारी समाजकल्याण विभागात ठिय्या आंदोलन केले.समाजकल्याणच्या योजनेसाठी ५४ लाभार्थ्यांना पात्र ठरविण्यात आले. त्यांच्या प्रस्तावावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी २४ नोव्हेंबर रोजी स्वाक्षरी केली. त्यानंतरही या अनुुदानाचे वाटप झाले नाही. लाभार्थी चौकशीसाठी समाजकल्याण विभागात आले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. काही प्रस्तावांमध्ये जाणीवपूर्वक त्रृटी काढण्याचे काम केले जात होते. हा प्रकार युवक काँग्रेसचे नितीन मिर्झापुरे यांना सांगण्यात आला. त्यांनी आज कार्यकर्त्यांसह समाजकल्याण विभागात धडक दिली. जोपर्यंत अनुदान वाटप होत नाही, तोपर्यंत कक्षातच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर समाजकल्याणमधील कर्मचारी वर्ग व अधिकारी हादरले. आंदोलक व समाजकल्याणचे अधिकारी यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर यांच्या कक्षात धाव घेतली. येथे सर्वांचे अनुदान वाटप करण्याचे आश्वासन समाजकल्याण अधिकारी जया राऊत यांनी दिले. त्यानंतर या आंदोलनाची सांगता झाली. यावेळी चंदन हातागडे, क्रिष्णा पुसनाके, पीयूष वानखडे, अमीर बोथा, आशीष काळे, आशुतोष शर्मा, समीर शेख, कौस्तुभ शिर्के, फईम खान, अरुण ठाकूर, दर्शन ढोक, सुमंत गुगरकर आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)
समाजकल्याण अधिकाऱ्याच्या कक्षात ठिय्या आंदोलन
By admin | Updated: December 8, 2015 03:20 IST