लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ घाटंजी, नेर, कळंब, राळेगाव तालुक्यात आंदोलन करण्यात आले. ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. दंगलखोर तसेच दंगल घडविण्यात सहभागी गावातील लोकांवर गुन्हा नोंदविण्यात यावा, दंगलीची न्यायालयीन चौकशी व्हावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.घाटंजी तालुक्याच्या साखरा येथे दोन तास रास्ता रोको करण्यात आला. यामुळे पारवा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दंगलीत मृत्यू झालेल्या युवकाला यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली. जरुर येथेही रास्ता रोको करण्यात आला. काँग्रेस कमिटी, भारिप-बहुजन महासंघ, संभाजी ब्रिगेड, भारतीय बौध्द महासभा, समता सैनिक दल, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन मुक्ती मोर्चा, समता पर्व आदी संघटना, संस्थातर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. पारवा चौफुलीवर रस्ता रोको करण्यात आला. आंबेडकरनगरातून मोर्चा काढण्यात आला. पारवा ठाणेदारांना निवेदन देण्यात आले.नेर येथील संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद होती. शहरातून निषेध रॅली काढण्यात आली. तसेच भीम तरुण उत्साही मंडळाच्यावतीने तहसीलदार अमोल पोवार यांना निवेदन देण्यात आले. तालुक्याच्या सातेफळ आणि शिरसगाव येथे रास्ता रोको करण्यात आला.कळंब येथे चक्काचाम आंदोलन करण्यात आले. बाजारपेठही बंद ठेवण्यात आली. तहसीलदार रणजित भोसले यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. गांधीनगर येथे तीन तास रास्ता रोको करण्यात आला. जवळपास ४०० नागरिकांनी हे आंदोलन केले. यवतमाळ-पांढरकवडा महामार्गावर टायर जाळण्यात आले. आंदोलनामुळे रस्त्याच्या दोनही बाजूंकडे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याठिकाणी आंदोलनकर्त्यांनी भीमा कोरेगाव घटनेचा निषेध नोंदविला.राळेगाव येथे रिपाइं आठवले गटातर्फे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांना निवेदन देण्यात आले. दंगलखोर, दंगल घडविण्यात सहभागी गावातील रहिवाशांवर सुधारित अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात यावा, दंगलीची पारदर्शक न्यायालयीन चौकशी व्हावी आदी मागण्या करण्यात आल्या.पांढरकवडा तालुक्यातील मोहदा येथे आंदोलन करण्यात आले. येथील बाजारपेठ बंद होती. बौद्ध विहारापासून शहराच्या विविध भागातून मोर्चा काढण्यात आला.अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर वारंवार होणारे अत्याचार थांबविण्यात यावे, आदी मागण्याही करण्यात आल्या आहे.
घाटंजी, नेर, कळंब, राळेगावात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 23:03 IST
भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ घाटंजी, नेर, कळंब, राळेगाव तालुक्यात आंदोलन करण्यात आले. ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. दंगलखोर तसेच दंगल घडविण्यात सहभागी गावातील लोकांवर गुन्हा नोंदविण्यात यावा, ....
घाटंजी, नेर, कळंब, राळेगावात आंदोलन
ठळक मुद्देग्रामीण भागातही रास्ता रोको : व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद, निषेध रॅली काढून प्रशासनाला निवेदन