सकाळचा उत्साह दुपारी निराशेत बदलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 11:08 PM2019-05-23T23:08:00+5:302019-05-23T23:09:19+5:30

शिवसेनेच्या कार्यालयापेक्षाही सर्वाधिक गर्दी काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्या निवासस्थानी झाली होती. बुधवारपासूनच या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. गुरुवारी कार्यकर्त्यांसाठी चहापान आणि नाश्त्याचीही व्यवस्था झाली होती.

The morning's enthusiasm turned into disappointment in the afternoon | सकाळचा उत्साह दुपारी निराशेत बदलला

सकाळचा उत्साह दुपारी निराशेत बदलला

Next
ठळक मुद्देकाँग्रेसला पराभवाचा धक्का : माणिकराव ठाकरे यांच्या निवासस्थानी चिंतन बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शिवसेनेच्या कार्यालयापेक्षाही सर्वाधिक गर्दी काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्या निवासस्थानी झाली होती. बुधवारपासूनच या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. गुरुवारी कार्यकर्त्यांसाठी चहापान आणि नाश्त्याचीही व्यवस्था झाली होती. उत्साहाचे वातावरण दुपारपर्यंत माणिकराव ठाकरे यांच्या निवासस्थानी पाहायला मिळाले. मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये अंतर वाढत जाताना कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे सावट पसरल्याचे दिसत होते. भावना गवळी यांच्या मोठ्या मताधिक्याच्या आकडेवारीची वार्ता या ठिकाणी पोहोचल्यानंतर निराशा वाढत गेली. सायंकाळी साडेचार ते पाच वाजेदरम्यान या ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्यासह काँग्रेसची ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती. या बैठकीमध्ये माणिकराव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी हितगूज केले. मतातील फरकांची कारणमीमांसा केली जात होती. पुढील काळात हा प्रश्न उद्भवू नये याकरिता कार्यकर्त्यांनी काही टिप्सही माणिकराव ठाकरे यांना दिल्या. सरकारप्रती जनतेमध्ये रोष होता. मात्र हा रोष मतांमध्ये परिवर्तित करता आला नाही, याची खंतही खुद्द माणिकराव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखविली. जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे. मात्र आमच्या उणिवा काय राहिल्या हे तपासले पाहिजे, असेही ते म्हणाले.
माणिकराव ठाकरे यांच्या प्रचारासाठी झटलेल्या कार्यकर्त्यांनी निकालाची आकडेवारी पाहून प्रचंड धसका घेतला. त्यांनी माणिकराव ठाकरे यांना धीर देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी कार्यकर्त्यांनी आपले प्रयत्न प्रामाणिक होते, असे मतही ठाकरे यांच्यापुढे बोलून दाखविले. एकूणच लागलेल्या निकालाबाबत प्रत्येकाच्या मनामध्ये चिंतेचे वातावरण होते. ठाकरेच विजयी होतील म्हणून थेट वाशिम, मानोरा, कारंजा या ठिकाणांवरून कार्यकर्ते मोठ्या संख्येने यवतमाळात आले होते. मतांमधील घसरण पाहून प्रत्येक फेरीला कार्यकर्ते माणिकरावांना धीर देत होते. आपलेही आकडे वाढतील, असा विश्वास देत होते. मात्र सरतेशेवटी मतांतील अंतरच वाढत गेले.
मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीवरील बातम्या...
आपल्या उमेदवाराला किती मते पडली, विरोधी पक्षाला किती मते आहेत याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र कक्ष उघडण्यात आला होता. संपूर्ण माहिती अपडेट जाणून घेण्यासाठी मोबाईल आणि लॅपटॉपचाही वापर करण्यात आला. प्रत्यक्षात पुढे येणारे आकडे पाहून सारेच थक्क होत होते. टीव्हीवरील बातम्यांनी तर त्यांच्या मनामध्ये चांगलीच धडकी भरली होती. यानंतरही पुढील फेरी आपलीच असेल, असा विश्वास प्रत्येकाकडे होता.

Web Title: The morning's enthusiasm turned into disappointment in the afternoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.