माया तुळपुळे : पांढरे डाग विषयावरील मार्गदर्शन कार्यशाळा, सखी मंच व आयएमएचा उपक्रमयवतमाळ : जागतिकीकरणाच्या युगात दिसण्याला अधिक महत्व दिले जाते. मात्र हा समज बदलण्याची आता वेळ आली आहे. आजच्या युगात केवळ सौंदर्य महत्वाचे नाही तर त्या पलिकडे जाऊन मनाचे सौंदर्य अधिक महत्वाचे आहे, असे प्रतिपादन श्वेता असोसिएशनच्या डॉ.माया तुळपुळे यांनी येथे केले. लोकमत सखी मंच आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) शाखा यवतमाळच्यावतीने येथील दर्डा मातोश्री सभागृहात पांढरे डाग विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात डॉ. तुळपुळे मार्गदर्शन करीत होत्या. अध्यक्षस्थानी लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा होते. प्रमुख पाहुणे म्हणून आयएमएचे नियोजित राज्याध्यक्ष डॉ. टी.सी. राठोड, डॉ. रमेश पाटील, डॉ. सी.बी. अग्रवाल, आयएमएचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेंद्र भुयार उपस्थित होते. श्वेता संस्थेच्या माध्यमातून डॉ. तुळपुळे पांढरे डाग असलेल्या व्यक्तींसाठी कार्यरत आहे. अशा व्यक्तींमधील न्यूनगंड कमी करून त्यांच्यात आत्मविश्वास पेरण्याचे काम त्या करतात. त्यांनी यावेळी पांढरे डागाबद्दल असणारे समज आणि गैरसमज यावर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात किशो दर्डा म्हणाले, पांढरे डाग ही अनादी काळापासून चालत आलेली समस्या आहे. या समस्येवर मात करण्यासाठी मन सुंदर असण्याची आवश्यकता आहे. यावेळी श्वेता असोसिएशन निर्मित आणि डॉ. माया तुळपुळे प्रस्तूत नितळ या चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला होता. या चित्रपटातून पांढरे डाग असणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींच्या अडचणी मांडण्याचा प्रयत्न करीत त्यांच्यात नवी उमेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या कार्यक्रमाला आयएमएचे सदस्य आणि सखी उपस्थित होत्या. (उपक्रम प्रतिनिधी)
बाह्य सौंदर्यापेक्षा मनाचे सौंदर्य अधिक महत्त्वाचे
By admin | Updated: August 26, 2014 00:15 IST