यवतमाळ : सांसद दत्तक ग्राम योजनेच्या धर्तीवर जिल्हा परिषदेने दत्तक घेतलेल्या गावांचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत असून त्यासाठी सॅटेलाईटच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येणार आहे.यवतमाळ जिल्हा परिषदेने जलयुक्त शिवार योजना आणि स्वच्छ भारत अभियानाची संयुक्त अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून जिल्ह्यातील ६३ गाव जिल्हा परिषद सदस्यांना दत्तक देण्यात आले आहे. या गावांच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यासाठी धडक मोहीम जिल्हा परिषदेने हाती घेतली आहे. जिल्हा परिषद सदस्यांना दत्तक देण्यात आलेले गाव राज्यापुढे आदर्श ग्राम ठरावे म्हणून उपाययोजना करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक दत्तक गावातील प्रश्न निकाली निघावे म्हणून सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे. या गावातील प्रमुख समस्या कोणत्या, त्यावर कोणते उपाय करता येईल याची माहिती ग्रामस्थांकडून घेतली जाणार आहे. यासोबतच शासकीय योजना गावांमध्ये राबविण्यासाठी स्वतंत्र आढावा घेतला जाणार आहे.गावातील जलस्रोत मजबूत करण्याच्यादृष्टीने प्रयत्न होणार आहे. यामध्ये गावातून जाणारा नाला अथवा नदीपात्र जागोजागी अडविले जाणार आहे. यासोबतच गावालगतच्या तलावातील गाळही काढला जाईल. गाळलेले बंधारे आणि नदी पात्र पुनरुजिवित करण्यात येणार आहे. शेतामध्ये उताराला आडवे चर खोदण्यासाठी उपाय योजले जाणार आहे. यासाठी गावाचा सॅटेलाईट नकाशा घेतला जाणार आहे. प्रत्येक दत्तक ग्राममध्ये हा नकाशा ग्रामपंचायतीत दर्शनी स्थळी लावला जाईल. या नकाशाच्या मदतीने विविध विकास कामे हाती घेतली जाणार आहे. गावांमध्ये जनजागृती करून गाव हागणदारीमुक्तही केले जाणार आहे. याबाबत रविवारी आढावा बैठक होणार आहे. (शहर वार्ताहर)
जिल्हा परिषदेच्या दत्तक गावांचे सूक्ष्म नियोजन
By admin | Updated: April 19, 2015 02:08 IST