मेटीखेडा आरोग्य केंद्राला ‘१०८’ ठरली औटघटकेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 09:53 PM2018-10-20T21:53:12+5:302018-10-20T21:54:03+5:30

गंभीर रुग्णाला तात्काळ इतरत्र हलविता यावे यासाठी मेटीखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला १०८ ही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली होती. अवघ्या काही दिवसात हे वाहन परत गेल्याने या आरोग्य केंद्रासाठी ही सेवा औटघटकेची ठरली आहे.

The Metikheeda Health Center has been named '108' | मेटीखेडा आरोग्य केंद्राला ‘१०८’ ठरली औटघटकेची

मेटीखेडा आरोग्य केंद्राला ‘१०८’ ठरली औटघटकेची

Next
ठळक मुद्देजुनी रुग्णवाहिका कालबाह्य : वर्षभरापासून एकच अधिकारी, थातुरमातूर उपचार

निश्चल गौर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंगरखर्डा : गंभीर रुग्णाला तात्काळ इतरत्र हलविता यावे यासाठी मेटीखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला १०८ ही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली होती. अवघ्या काही दिवसात हे वाहन परत गेल्याने या आरोग्य केंद्रासाठी ही सेवा औटघटकेची ठरली आहे. शिवाय सदर आरोग्य केंद्रात अनेक समस्याही निर्माण झाल्या आहेत.
२५ ते ३० गावातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी याकरिता मेटीखेडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. सुरुवातीला आवश्यक त्या सर्व सुविधा याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. कालांतराने त्यात कमालीची शिथीलता आली. रुग्णवाहिकेच्या बाबतीतही तेच झाले. १२ वर्षांपूर्वी या आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली होती. आता ती दयनीय स्थितीत आहे. मार्गात केव्हा बंद पडेल याचा नेम राहिलेला नाही. सदर आरोग्य केंद्रात दररोज १५० ते २०० रुग्ण उपचारासाठी येतात. प्रामुख्याने गरोदर माता आणि लहान बालकांचा यात समावेश आहे. यातील अनेक रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इतर ठिकाणी हलविले जाते. रुग्णवाहिका सुस्थितीत नसल्याने खासगी वाहनाद्वारे रुग्णांना हलवावे लागते.
जुनी रुग्णवाहिका साथ देत नसल्याने काही महिन्यांपूर्वी या आरोग्य केंद्राला १०८ ही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र अवघ्या काही दिवसातच ती परत गेली. आता रुग्णवाहिकेअभावी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हा प्रश्न नागरिकांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठांकडे अनेकदा मांडला. मात्र कुणीही गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीचा रोष व्यक्त होत आहे.
रिक्त पदांचा आजार
कळंब तालुक्यात येत असलेल्या मेटीखेडा आरोग्य केंद्रात विविध संवर्गातील अनेक पदेही रिक्त आहेत. परिणामी समाधानकारक सेवेपासून रुग्णांना वंचित राहावे लागत आहे. या आरोग्य केंद्रासाठी दोन डॉक्टरांची नियुक्ती असली तरी प्रत्यक्षात मागील एक वर्षापासून एकाच अधिकाऱ्यावर काम ढकलले जात आहे. लिपिक, परिचारिका ही पदेही रिक्त आहेत. विशेष म्हणजे, मागील चार ते पाच महिन्यांपासून डॉक्टरांचे वेतनही रखडले आहे. याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे. परिसराशी संबंधित लोकप्रतिनिधींनाही या विषयाची माहिती देण्यात आली. त्यांचे दुर्लक्ष सुरू आहे.

Web Title: The Metikheeda Health Center has been named '108'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.