येरझारांनी आजार वाढले : कार्यालयीन गैरहजेरीने नागरिकांचा रोष यवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात अधिकाऱ्यांचे बैठक सत्र सुरू आहे. या बैठकांमुळे अनेक अधिकारी त्रस्त झाले असून काम करावे तरी कधी, असा प्रश्न त्यांनीच उपस्थित केला आहे. जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी विभाग आदींमार्फत विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. शेतकरी आणि ग्रामस्थांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी कार्य करीत आहे. मात्र या योजनांच्या अनुषंगाने होणाऱ्या बैठकींमुळे आता अनेक अधिकारी आणि कर्मचारी त्रस्त झाले आहे. वारंवार जिल्हा अथवा तालुकास्तरावर बैठका होत असल्याने त्यांचा वेळ येण्या-जाण्यातच खर्ची होत आहे. शिवाय मणक्याचे व अन्य आजारही बळावत आहे. प्रत्यक्ष कामासाठी अधिकाऱ्याकडे १२ ते १४ दिवस शिल्लक असतात. त्यात विविध योजनांची अंमलबजावणी करावी लागते. त्यात अनेकदा, धरणे, मोर्चे, आंदोलन असतात. यात त्यांचे कामाचे दिवस वाया जातात. परिणामी उर्वरित दिवसांत किती आणि कोणते काम करावे तरी कधी, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. सततच्या या बैठका पाहता आम्ही यवतमाळातच मुक्कामी रहावे का? असा सवाल अधिकारी विचारत आहे. सततच्या बैठकांमुळे कार्यालयात गैरहजर दिसत असल्याने नागरिकांचा रोषही पत्करावा लागतो. त्यातूनच कामे होत नाहीत, असे म्हणून नागरिक तक्रारी करतात, बदलीची मागणी करीत असल्याची व्यथा अधिकाऱ्यांनी मांडली. (शहर प्रतिनिधी) महिन्यातील चार रविवार आणि दोन शनिवारी शासकीय सुटी असते. या व्यतिरिक्त आता महिन्यात किमान एक-दोन सण येतात. त्यामुळे महिन्यातील किमान आठ दिवस सुटीतच जातात. उरलेल्या २२ दिवसांपैकी किमान आठ ते दहा दिवस तालुका आणि जिल्हास्तरीय बैठकीत निघून जातात.
बैठकांचे सत्र, अधिकारी त्रस्त
By admin | Updated: July 29, 2016 02:17 IST