यवतमाळ : येथील जैन समाज बांधवांची बैठक मंगळवारी सायंकाळी स्थानिक लकडगंजस्थित केसरिया भवनात पार पडली. यावेळी लोकमत मीडिया लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, माजी आमदार कीर्ती गांधी, विजय कोटेचा व्यासपीठावर उपस्थित होते. केसरिया भवन येथे सुमतीनाथ स्वामींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या अनुषंगाने नियोजन करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. ११ फेब्रुवारी २०१५ रोजी ही प्राणप्रतिष्ठा करण्याचे निश्चित आहे. हा मोठा उत्सव यवतमाळात होवू घातला आहे. याच बैठकीत जैन समाजाला मिळालेला अल्पसंख्यक दर्जा, काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी केलेले प्रयत्न, यवतमाळ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यावरही चर्चा झाली. विजय दर्डा म्हणाले, यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार राहुल माणिकराव ठाकरे यांच्या विजयाबाबत तीळमात्र शंका नाही. तरीही त्यांचा विजय मताधिक्याने करण्यासाठी जैन समाज बांधवांनी त्यांना साथ द्यावी. जैन समाजाला अल्पसंख्यक दर्जा मिळवून देण्यासाठी विजय दर्डा यांनी मोठे प्रयत्न केल्याचे स्मरण यावेळी माणिकराव ठाकरे यांनी करून दिले. यावेळी जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन प्रसन्न दप्तरी यांनी केले. यशस्वीतेसाठी राजेंद्र खिवसरा, रवींद्र कोठारी, डॉ. रमेश खिवसरा, राजू जैन आदींनी पुढाकार घेतला. (प्रतिनिधी)
जैन समाज बांधवांची बैठक
By admin | Updated: October 15, 2014 23:24 IST