यवतमाळ : पतीसोबत वाद झाल्यानंतर भावाकडे आलेल्या विवाहितेचा पतीने गुरुवारी दुपारी चाकूने भोसकून खून केला. या घटनेची माहिती डायल ११२ वरून पोलिसांना मिळाली. लोहारा पाेलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा विवाहिता जागेवरच गतप्राण झाली होती. ही थरारक घटना चौसाळा मार्गावरील साईदृष्टी अपार्टमेंट (बोदड) येथील पार्किंगमध्ये घडली.
देवयानी चंद्रशेखर ठक (२७) रा. शुभम मंगल कार्यालयाजवळ भोसा असे मृत महिलेचे नाव आहे. ती पतीसोबत वाद झाल्यामुळे चौसाळा मार्गावरील साईदृष्टी अपार्टमेंटमध्ये भावाकडे आली होती. तिला दोन वर्षांचा मुलगा आहे. पत्नीवर संतापलेला चंद्रशेखर गुरुवारी दुपारी चौसाळा रोडवर पोहोचला. तेथे अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये देवयानीसाेबत पुन्हा वाद घातला. या वादातच चंद्रशेखरने धारदार चाकूने तिच्यावर सपासप वार केले. हे दृश्य पाहणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना डायल ११२ वरून घटनेची माहिती दिली. लोहारा पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत देवयानी जागेवरच गतप्राण झाली होती.
आरोपी चंद्रशेखर तेथून पसार झाला. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक गजानन अजमिरे व त्यांच्या पथकाने भेट दिली. ही घटना दुपारी २:४५ वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे. खून नेमका कोणत्या कारणाने झाला, याचाही उलगडा झालेला नाही. देवयानीचा भाऊ ॲड. अश्विन ठाकरे हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. देवयानी घरी एकटी असतानाच हा प्रकार घडल्याचेही सांगण्यात आले. या घटनेचा अधिक तपास केल्यानंतरच वास्तव पुढे येणार आहे. पोलिसांनी तूर्त घटनास्थळ पंचनामा करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. घटनास्थळावर फॉरेन्सिक व्हॅनही दाखल झाली आहे. त्यांच्याकडून तेथील भौतिक व रासायनिक नमुने गोळा केले जात आहे.