लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : कर्जबाजारीपणामुळे स्वत:ला जाळून घेणाऱ्या मार्लेगाव येथील शेतकऱ्याचा तब्बल सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी पहाटे मृत्यू झाला. या घटनेमुळे गावकऱ्यांनी डोक्याला काळ्या फिती बांधून शासनाचा निषेध करीत अंत्ययात्रा काढली.श्यामराव रामा भोपळे, (६८) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे. त्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून ५ मे रोजी मध्यरात्री घरासमोरील निंबाच्या झाडाखाली अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. ही घटना ६ मे रोजी पहाटे उघडकीस आली. त्यांना प्रथम येथील ग्रामीण रुग्णालय आणि नंतर नांदेड येथील शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. नांदेड येथे सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी पहाटे १.३० वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली.भोपळे यांच्यावर सोसायटीचे २१ हजारांचे कर्ज होते. कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने त्यांना पुढील खरीप हंगामाची चिंता सतावत होती. या विवंचनेत त्यांनी जाळून घेतले.पैनगंगा नदीकाठी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर नदी पात्रात आयोजित शोकसभेत शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीचे देवानंद पवार यांनी ही भोपळे यांची अंत्ययात्रा नसून मोदी व फडणवीस सरकारची निषेध यात्रा असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार विजय खडसे, नांदेडच्या महापौर शीला भवरे, माजी उपनगराध्यक्ष किशोर भवरे, माजी सभापती आत्माराम शिंदे, संभाजी ब्रिगेडचे गुणवंत सूर्यवंशी, उमरखेडचे उपनगराध्यक्ष अरविंद भोयर, गजानन सोळंके, सरोज देशमुख, आशाताई देवसरकर, सरपंच कैलास शिंदे, नाथा पाटील व गावकरी उपस्थित होते.प्रशासनाने ठेवला मार्लेगावात तगडा बंदोबस्तकर्जबाजारीपुणामुळे श्यामराव भोपळे यांनी जाळून घेतले. तरीही शासन आणि प्रशासनाने दखल घेतली नाही. यामुळे संतापलेल्या गावकºयांनी डोक्याला काळ्या फिती बांधून शासनाचा निषेध करीत भोपळे यांची अंत्ययात्रा काढली. त्यासाठी प्रशासनाने गावात तगडा बंदोबस्त ठेवला. पैनगंगा नदी काठावर भोपळे यांचा अंत्यविधी पार पडला.
मार्लेगावच्या शेतकऱ्याची झुंज ठरली व्यर्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 23:59 IST
कर्जबाजारीपणामुळे स्वत:ला जाळून घेणाऱ्या मार्लेगाव येथील शेतकऱ्याचा तब्बल सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी पहाटे मृत्यू झाला. या घटनेमुळे गावकऱ्यांनी डोक्याला काळ्या फिती बांधून शासनाचा निषेध करीत अंत्ययात्रा काढली.
मार्लेगावच्या शेतकऱ्याची झुंज ठरली व्यर्थ
ठळक मुद्देसहाव्या दिवशी मृत्यू : गावकऱ्यांनी काढली डोक्याला काळ्या फिती बांधून अंत्ययात्रा