‘मजीप्रा’ने सोडले २७ लाखांवर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 06:00 AM2019-08-31T06:00:00+5:302019-08-31T06:00:05+5:30

‘अमृत’ योजनेअंतर्गत यवतमाळ शहरासाठी बेंबळा प्रकल्पातून पाणी आणले जात आहे. ३०२ कोटी रुपयांच्या या योजनेची गाथा सर्वदूर पोहोचली आहे. करारानुसार ऑक्टोबर २०१९ पर्यंत काम पूर्ण करून प्राधिकरणाला योजना हस्तांतरित करायची आहे. याला अवघे दोन महिने शिल्लक आहे. प्रत्यक्षात ६० टक्केच्या आसपास काम झाले आहे.

'Majipra' released 5 lakhs of water | ‘मजीप्रा’ने सोडले २७ लाखांवर पाणी

‘मजीप्रा’ने सोडले २७ लाखांवर पाणी

Next
ठळक मुद्देकंत्राटदारावर मेहेरबानी : दरमहा साडेचार लाखांच्या दंडाला स्थगिती!

विलास गावंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अमृत योजनेच्या कंत्राटदाराला ठोकण्यात आलेल्या दंडाच्या २७ लाख रुपयांवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणी सोडले आहे. काम पूर्ण करून घ्यायचे आहे, असे कारण सांगत प्राधिकरणाने ही मेहेरबानी दाखविली आहे. एवढेच नाही तर, दंड झाल्यानंतर या कंत्राटदाराला कोट्यवधी रुपयांची बिलेही देण्यात आली.
‘अमृत’ योजनेअंतर्गत यवतमाळ शहरासाठी बेंबळा प्रकल्पातून पाणी आणले जात आहे. ३०२ कोटी रुपयांच्या या योजनेची गाथा सर्वदूर पोहोचली आहे. करारानुसार ऑक्टोबर २०१९ पर्यंत काम पूर्ण करून प्राधिकरणाला योजना हस्तांतरित करायची आहे. याला अवघे दोन महिने शिल्लक आहे. प्रत्यक्षात ६० टक्केच्या आसपास काम झाले आहे. कामाची प्रगती नसल्याने प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांनी मे.पी.एम. आडके कंपनीला दरमहा चार लाख ६१ हजार ९९० रुपये दंड ठोकला. एप्रिल २०१९ पासून हा दंड लागू करण्यात आला.
आता मात्र प्राधिकरणाने या दंडाला सप्टेंबर २०१९ पर्यंत स्थगिती दिली आहे. या कालावधीपर्यंत कामाची प्रगती पाहून दंडाविषयी विचार केला जाणार असल्याचे सांगितले जाते.
तूर्तास तरी सहा महिन्याचे एकूण २७ लाख ७१ हजार ९४० रुपये सोडण्याची प्राधिकरणाची तयारी असल्याचे दिसून येते. कामापोटी २९ वे देयक आडके कंपनीला देण्यात आले आहे. आता ३० वे देयक पास होत आहे.
‘सीएम’च्या हस्ते पाणी पाजण्याचे नियोजन
विधानसभेची निवडणूक अगदी काही महिन्यावर आली आहे. बेंबळाचे पाणी निवडणुकीपूर्वी यवतमाळात आणता येईल, यासाठी आटापिटा सुरू आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यवतमाळला पाणी पाजण्याचा प्रयत्न आहे. सप्टेंबरपर्यंत किमान पाईपलाईन पूर्ण करून घ्यायची आहे. दंड आकारल्यास काम थांबेल आणि सप्टेंबरच्या प्रयत्नावर पाणी फेरले जाईल, अशी शक्यता पाहता तूर्तास दंडाला स्थगितीचा फंडा शोधून काढण्यात आला असल्याची चर्चा आहे.

बेंबळाचे काम पूर्ण करून घ्यायचे आहे. कंत्राटदाराला दंड लावल्यास काम थांबेल. तूर्तास सप्टेंबरपर्यंत दंडास स्थगिती देण्यात आली आहे. कामाची प्रगती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल.
- सुरेश हुंगे, कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, यवतमाळ

सप्टेंबरपर्यंत काम शक्य, पण...
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अमरावतीत बसलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या योजनेच्या कामाची ‘प्रगती’ गेल्या आठवड्यात तपासली. पाईपलाईन सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे फर्मान त्यांनी सोडले. ही बाब शक्यही आहे, पण हायड्रोलिक टेस्टिंग न करता. सध्या केवळ अडीच किमीचे हे टेस्टिंग झाले आहे. पाईपलाईनचे काम केवळ तीन किमी शिल्लक राहिले आहे. येत्या दोन महिन्यात ते पूर्ण होईल. पण टेस्टिंग होणार नाही. यवतमाळात पाणी आणण्याची सोय या कालावधीत होईल. पाईपने पुन्हा आपला रंग दाखविला, कुठे लिकेज असल्यास ये रे माझ्या मागल्या, अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

Web Title: 'Majipra' released 5 lakhs of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.