लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वसुली पथकाकडून केवळ कर्जदार शेतकऱ्यांना लक्ष केले जात आहे. मालमत्तेच्या थेट जप्तीची कार्यवाही करण्यासाठी बँकेचे वसुली पथक महागाव तालुक्यात फिरत आहे. या वसुली पथकाचा शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी बँकेचे वसुली पथक तालुक्यातील करंजखेड गावी धडकले होते.
काही शेतकऱ्याकडे थकीत कर्ज असल्यामुळे त्यांच्या मालमत्ता जप्ती करण्यासाठी पथक गावात आल्याने चांगलीच खळबळ उडाली. ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी असूनही तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वसुली पथक थेट जप्तीच्या कार्यवाहीसाठी फिरू लागले आहे. जिल्हा बँकेच्या या धोरणाविरुद्ध तालुक्यात शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे अंबोडा येथील भास्कर पतंगराव या शेतकऱ्याच्या मालमत्तेवर जप्ती आणण्यात आली आहे. तसेच सेवानगर येथील भाऊराव भिकू राठोड यांची मालमत्ता बँकेने ताब्यात घेतली आहे. कर्जाची थकबाकी तीन ते चार लाख रुपये असताना शेतकऱ्यांना टार्गेट केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.
या शेतकऱ्यांकडे आले होते बँकेचे वसुली पथक
- दत्तराव पवार करंजी यांच्याकडे दोन लाख ५६ हजार रुपये कर्ज, प्रकाश सोळंके करंजी यांच्याकडे दोन लाख २५ हजार, आनंदराव शिंदे वाघनाथ यांच्याकडे एक लाख ३९ हजार, नारायण देवकर करंजखेड यांच्याकडे एक लाख ६५ हजार रुपये थकबाकी आहे.
- रंजना शिंदे वाघनाथ कर्ज ७२ हजार, लक्ष्मीबाई चव्हाण करंजखेड यांच्याकडे ८३ हजार, अनुसया भांगे यांच्याकडे चार लाख तर, दादाराव ठाकरे या शेतकऱ्याकडे एक लाख २० हजार कर्ज आहे. त्यावरील व्याज थकबाकी वसुलीकरिता बँकेचे वसुली पथक धडकले होते.
"करंजखेड विविध कार्यकारी सोसायटी 'अ' वर्गात आहे. या सोसायटीची वसुली ८५ टक्के आहे. ज्या शेतकऱ्याकडे थकबाकी दाखवण्यात आली. ती ओटीएस या योजनेत बसवता आली असती. परंतु जिल्हा बँकेच्या निरीक्षकांनी त्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही आणि शेतकरी थकीत होत गेले. याला बँकही तितकीच कारणीभूत आहे."- लक्ष्मीकांत भांगे, अध्यक्ष, विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, करंजखेड