यवतमाळ : शहरासह लगतच्या ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जीवन प्राधिकरणाचे ३३ कोटी थकले आहेत. यात नगरपरिषद आघाडीवर असून चार हजार नागरिकांनी पाण्याचे बिल भरलेच नाही. त्यामुळे हा आकडा वाढला आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी वसुलीचे आव्हान आहे. जीवन प्राधिकरणाचे एकूण २९ हजार ग्राहक आहेत. या ग्राहकांना नियमित पाण्याचा पुरवठा केला जातो. याचे दरमहा बिलसुध्दा ग्राहकांपर्यत पोहोचविण्यात येते. त्यानंतरही वेळेत बिलाचा भरणा केला जात नाही. २९ हजार ग्राहकांपैकी चार हजार ग्राहकांकडे मोठी रक्कम थकीत आहे. घरगुती ग्राहकांसोेबत शासकीय कार्यालय, व्यावसायिक प्रतिष्ठानांकडे २२ कोटी ९१ लाख २७ हजार रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीचे व्याज १० कोटी ९९ लाख रुपयांवर पोहोचले आहे. थकीत बिलाच्या वसुलीचे अवघड काम प्राधिकरणावर येऊन ठेपले आहे. घरगुती ग्राहकांसोबत शासकीय कार्यालयांची थकबाकी सर्वात मोठी आहे. यात यवतमाळ नगरपरिषद आघाडीवर आहे. २१३ स्टँडपोस्टचे पाण्याचे बिल दोन कोटी ५९ लाख रुपयांच्या घरात पोहोचले आहे. यामुळे जीवन प्राधिकरणाने नगरपरिषदेला तत्काळ बिल अदा करण्याची नोटीस बजावली आहे. थकबाकीच्या वसुलीसाठी प्राधिकरणाने धडक मोहीम हाती घेतली आहे. याबाबत उपाययोजना करण्यात आल्या आहेत. (शहर वार्ताहर)
जीवन प्राधिकरणाची थकबाकी ३३ कोटी
By admin | Updated: December 31, 2014 23:30 IST