लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात रायफल आणि जिवंत काडतूससाठा सापडल्यानंतर आंतरराज्यीय कनेक्शन समोर आले. उत्तर भारतातील शस्त्र तस्कर 'कामरान'ला एलसीबीने अटक केल्यानंतर खोलवर तपास केला जात आहे. यवतमाळात जप्त केलेल्या शस्त्रसाठ्याची पाळेमुळे उत्तर प्रदेश, दिल्लीत असून, दोन शस्त्र तस्कर पथकाच्या रडारवर आहेत.
एलसीबीने एकाच दिवशी दोन कारवाया करून रणवीर वर्मा (यवतमाळ) आणि मो. अशफार मो. असलम मलनस ऊर्फ भाया (यवतमाळ) या दोघांना अटक केली होती. यात रणवीरकडून पाच रायफली आणि ३५० जिवंत काडतुसे तर भायाकडून एक पंप एक्शन गन, पाच जिवंत काडतुसे जप्त केली होती. रणवीरने कामरान अहमद नईम अहमद (रा. देहरादून, उत्तराखंड) याच्याकडून शस्त्रसाठा खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. तसेच कामरानला अटक केली. कामरान शस्त्र तस्करीत उत्तर भारतात डंक्यावर असून, तो पोलिस रेकॉर्डवरही आहे. कामरानकडून शस्त्र तस्करीची एलसीबीने उकल करीत चौफेर तपास चालविला आहे. यात आणखी दोन मोठ्या शस्त्र तस्करांची माहिती पथकाच्या हाती लागली आहे. उत्तर प्रदेश, दिल्लीत तळ ठोकून असलेल्या पथकाकडून या तस्करांच्या अटकेचे प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणाचा तपास एलसीबीचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष मनवर आणि त्यांची टीम करीत आहे.
'गन हाउस'मधून शस्त्रांची 'खेप'कामरान आणि त्याच्या साथीदारांनी संपूर्ण देशात शस्त्र तस्करीचे नेटवर्क उभे केले आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत उत्तर प्रदेश, दिल्लीत 'गन हाऊस' अधिक आहे. येथील काही 'गन हाऊस' कामरानच्या शस्त्र तस्करीचे मुख्य केंद्रबिंदू आहेत. यातील एका गन हाऊसला काही वर्षांपूर्वी सील ठोकण्यात आले होते. शिवाय दिल्लीत दोन हजार जिवंत काडतुसे सापडल्याच्या प्रकरणात या हाऊस मालकाची तपास यंत्रणेकडून चौकशी झाली होती.