यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मिरगी, फीट या दुर्धर आजारांच्या रुग्णांसाठी मोफत तपासणी शिबिर घेण्यात आले. ग्रामीण भागातून आलेल्या तब्बल एक हजार ५० रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. इपीलिप्सी फाऊंडेशन मुंबई आणि जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शिबिरासाठी लागणारी साधन सामुग्री मोफत उपलब्ध करून दिली. न्युरोफिजीशियन डॉ. निर्मल सूर्या यांच्या पथकाने रुग्णांची तपासणी केली. आवश्यक असलेल्या रुग्णांचे सिटीस्कॅन करण्यात आले, ईईजी काढण्यात आला. शिवाय सर्व रुग्णांना मोफत औषधी देण्यात आली. अतिशय महागड्या तपासण्या येथे मोफत करण्यात आल्या. या शिबिराला महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी भेट दिली. शिवाय अतिरिक्त आरोग्य संचालक डॉ. खानंदे, एनआरएचएमचे सल्लागार डॉ.एन.जी. राठोड, आरोग्य उपसंचालक डॉ. लव्हाळे उपस्थित होते. शिवाय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कुंदन राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक प्रेमानंद निखाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. किशोर इंगोले यांनी या आयोजनासाठी विशेष पुढाकार घेतला. ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना मार्गदर्शन व मदत करण्यासाठी रुग्णसेवक विकास क्षीरसागर व त्यांच्या पथकाने मदत केली. (कार्यालय प्रतिनिधी)
दुर्धर आजाराच्या एक हजार रुग्णांची तपासणी
By admin | Updated: December 21, 2014 23:06 IST