लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वणी तालुक्यात गंभीर गुन्हे शिरावर असलेल्या मोहंमद नावेद ऊर्फ गब्या याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिशय चाणाक्ष व क्रूर आरोपी म्हणून गब्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. उपचार घेत असलेल्या गब्याने पोलीस शिपायाला आपल्या बोलण्यातून भुरळ घातली. आजारपणात दवाखान्यातील जेवण खावेसे वाटत नाही, माझ्यावर दया कर, मला चांगल्या ठिकाणी जेवायला घेऊन चल असे म्हणत तो रुग्णालयाबाहेर पडला. संधी मिळताच शिपायाची दुचाकी घेऊन पळून गेला. पोलीस मुख्यालयातील शिपाई विठ्ठल गणपत टेकाम ब. नं. २३७ हा सुरक्षा गार्ड म्हणून रुग्णालयात कर्तव्यावर होता. कुख्यात गब्या आजारी असल्याने रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्याने बोलण्यातून साध्या, सरळ शिपायाला आपल्या जाळ्यात ओढले. मला मधुमेहासारखा आजार असून रुग्णालयातील जेवणाचा वास येतो, त्यामुळे माझी प्रकृती सुधारत नाही, असे म्हणत त्याला आपल्या बोलण्यातून भुरळ घातली. शिपाई टेकाम यालाही गब्याची दया आली. तो गब्याला स्वत:च्या एमएच-२९-यू-११६७ या दुचाकीवर बसवून रुग्णालयाबाहेर पडला. महादेव मंदिराच्या परिसरात गब्याने दुचाकी थांबविण्यास सांगितली. संधीचा फायदा घेत त्याने विठ्ठल टेकाम यांना जोरदार धक्का दिला व त्यांचीच दुचाकी घेऊन त्याने पोबारा केला. शिपाई आरडाओरडा करीपर्यंत गब्या पसार झाला होता. भावनेच्या आहारी जाऊन पाेलीस शिपायाने कायद्याचा भंग केला. आता त्याच्यावर खात्यांतर्गत कारवाई होणार आहे. मोठी चूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विठ्ठल टेकाम यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गब्याविरुद्ध कलम २२४, ३७९ भादंविनुसार गुन्हा दाखल केला.
यापूर्वीही एका शिपायाचा घेतला गैरफायदा - यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेत असलेल्या एका शिपायाने आर्थिक गुन्ह्यातील कुख्यात गुन्हेगाराला अशाच पद्धतीने लॉकअपबाहेर काढून नववर्षाची पार्टी साजरी केली होती. त्यावेळी संपूर्ण पाेलीस अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पथक हादरले होते. पहाटे त्या कुख्यात आरोपीला अटक करण्यात आली होती. त्या आरोपीनेही शिपायाच्या साध्याभोळेपणाचा फायदा घेऊन डाव साधला होता. त्याचीच पुनरावृत्ती गब्याने केली आहे.