- विशाल सोनटक्के, यवतमाळबोलल्यामुळे ऊर्जा विखुरली जाते आणि मौन ठेवल्याने ऊर्जा एकत्रित ठेवता येते. मौनाचा महिमा मोठा आहे. मानसमध्ये याला महामंत्राचा दर्जा दिला आहे. मौन राहून स्वीकार करायला शिकले पाहिजे. विनोबा भावे, स्वामी रामतीर्थ यांच्यासह सर्वच महापुरुषांनी ही स्वीकारार्हता जोपासली होती. दररोज वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या आपल्या भारतालाही आज या स्वीकारमंत्राची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध आध्यात्मिक संत मोरारीबापू यांनी केले.
यवतमाळ येथील चिंतामणी बाजार समितीच्या आवारात आयोजित रामकथा पर्वाच्या चौथ्या दिवशी मंगळवारी ते बोलत होते. मोरारीबापू यांनी रहीम यांचा दोहा ऐकविला. 'रहीम रोशन कीजिए, कोई कहे क्यों... हँसकर उत्तर दीजिए, हाँ बाबा यूँ,' साधनेमध्ये मौन महत्त्वाचे आहे. मौन आहे, तोपर्यंत तुम्ही मालक आहात. तोंड उघडले की, गुलाम झालात. लगेच प्रश्नांचा भडिमार होईल, असे का बोललात, असे का निवेदन केलेत. मौन राहिलात तर कोणीच बोलू शकणार नाही. कारण मौन स्वतःच गुलाम आहे, त्याचा कोणीच अर्थ लावू शकणार नाही.
पती-पत्नीने भक्ती केली तर घर होईल राममय
आज संसारात संघर्ष वाढला. यातून दाम्पत्य जीवनही संकटात आले. याचे कारण प्रेम आणि आदर या दोन गोष्टी लुप्त होत आहेत. पुरुष प्रेम देत नाही, स्त्री आदर करीत नाही; यामुळे वैमनस्य वाढते. स्त्रीला प्रेम आणि पुरुषाला आदर हवा असतो, दोघांनी मिळून भगवंताची भक्ती केली तर घर राममय होईल, असा संदेशही मोरारीबापू यांनी दिला.
समाधान हेच खरे धन : डॉ. विजय दर्डा
काय कमावले आणि काय गमावले याचा कधी हिशेब ठेवला नाही; परंतु या चार दिवसांत सर्वांनीच आचार-विचारांची मनसोक्त कमाई केली. मोरारीबापू म्हणाले की, वस्तूंचा संग्रह दुःख वाढवतो आणि त्याग सुख देते. मनुष्य वस्तूंचा संचय करीत राहिला तर लोभ, भय, अशांती जन्म घेते. त्यामुळे समाधान हेच खरे धन आहे.
जितके वाटू तितका आनंद आणि शांती मिळेल, असे सांगत लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन तथा रामकथा पर्वचे यजमान डॉ. विजय दर्डा यांनी वसीम बरेलवी यांचा शेर ऐकविला. 'जहाँ रहेगा, वही रोशनी लुटायेगा, किसी चिराग का अपना मकान नहीं होता.'