मिठाईच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह : ‘एफडीए’ला भेसळच दिसेना ! म्हणे, सर्वत्र आलबेलयवतमाळ : दिवाळीच्या काळात जिल्ह्याला मिठाईसाठी लागणारा सुमारे सहा हजार किलो खवा मध्यप्रदेश, गुजरात, गोंदियामधून आयात केला जातो. परंतु या खव्याची पर्यायाने त्यापासून बनणाऱ्या मिठाईची गुणवत्ता काय याबाबत प्रश्नचिन्ह लावले जात आहे. कारण या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणाऱ्या अन्न व औषधी प्रशासन विभागाला आजपर्यंत भेसळ आढळून आलेली नाही. त्यामुळे या विभागाच्या ‘कामगिरी’कडे संशयाने पाहिले जात आहे. पूर्वी ग्रामीण भागात व शहरालगतच्या गावखेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरे होती. त्यानंतरही दूध कमी पडत होते. आज लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. शहरांचाच नव्हे तर गावांचाही विस्तार झाला आहे. त्या तुलनेत चारा-पाणीटंचाईमुळे जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. दुधाच्या मागणीत वाढ आणि पुरवठ्यात प्रचंड घट झाल्याने तफावत निर्माण झाली आहे. त्यानंतरही दूध येते कोठून हा प्रश्न कायम आहे. येणारे दूध हे भेसळ करून आणले जात असावे, अशी दाट शक्यता आहे. चहाला व लहान मुलांना पिण्यासाठी दूध कमी पडत असताना मिठाईसाठी खवा बनवायला एवढे दूध येते कोठून हा अन्न व औषधी प्रशासनासाठी संशोधनाचा विषय ठरला आहे. केवळ दिवाळी या सणाचा विचार केल्यास यवतमाळ जिल्ह्यात तब्बल सहा हजार किलो खवा लागतो. जिल्ह्यातील दुधाचे उत्पादन मर्यादित असल्याने गुजरात, मध्यप्रदेशातील इंदोर, गोंदिया, अहमदनगर, पुसद, उमरखेड या भागातून जिल्ह्यात खवा आणला जातो. हा खवा पाच ते सहा दिवस टिकतो. परंतु तो अधिक काळ टिकावा, आंबूसपणा येऊ नये म्हणून त्यात साखर टाकली जाते. दूध पावडरपासून खवा बनविला जातो. त्यावर मलाई येत नसल्याने तो अधिक काळ टिकतो. खवा दीर्घकाळ टिकविण्यासाठी आरोग्याला घातक असलेल्या आरारोड पावडरचासुद्धा त्यात वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. दसरा ते दिवाळी या काळात दुधाची प्रचंड मागणी राहत असल्याने मिठाई कारखान्यांना बाहेरच्या खव्यावर अवलंबून रहावे लागते. बहुतांश मिठाईवाले ‘आमचे स्वत:चे दूध संकलन केंद्र आहे’ असे सांगतात. परंतु प्रत्यक्षात अशा दूध संकलकांची संख्या अगदीच बोटावर मोजण्याऐवढी आहे. गाई-म्हशीच्या एकूणच दुधाचे गणित पाहता बाहेरुन येणारा हा खवासुद्धा किती शुद्ध असेल याची शंका येते. पर्यायाने अनेक दुकानांमधून मिळणाऱ्या मिठाईच्या गुणवत्तेभोवती संशयाचे वलय निर्माण झाले आहे. अनेक दुकानांमध्ये ही मिठाई बनविण्यासाठी खास राजस्थान, इंदोर, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल येथून कारागीर बोलविले जातात. बहुतांश मिठाई विक्रेते ‘आम्ही बाहेरुन खवा आणत नाही, आमच्याकडे संकलित होणाऱ्या दुधात शक्य असेल तेवढीच मिठाई बनवितो’ असे सांगून शुद्धतेचा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्यक्षात ‘वास्तव’ मात्र वेगळेच आहे. खवा व पर्यायाने मिठाईमध्ये होणाऱ्या भेसळीला अन्न व औषधी प्रशासनाचाही हातभार लागत असल्याचे त्यांच्या ‘कामगिरी’वरून दिसून येते. यंदाच्या दिवाळीत या विभागाने दुग्धजन्य पदार्थांचे १२ नमुने घेतले. मात्र त्यात भेसळ आहे की नाही, याचा अहवाल अद्याप अमरावतीच्या प्रयोगशाळेतून प्राप्त झाला नाही. आजतागायत कुठेच मिठाईमध्ये भेसळ आढळली नसल्याचे येथील सहायक आयुक्तांनी (अन्न) ‘लोकमत’ला सांगितले. खवा टिकविण्यासाठी स्टार्च, आरारोड मिसळविला जातो. खवा चार डिग्री तापमानावर ठेवल्यास अधिक काळ टिकतो. मात्र हा खवा किती दिवस टिकू शकतो, याचे कोणतेही निकष नाहीत. ग्राहकांनी घरी नेल्यावर खव्याचा तातडीने उपयोग करावा, मिठाई २४ तासात वापरावी अन्यथा विषबाधा होण्याची शक्यता असते, असा इशारा अन्न व औषधी प्रशासन विभागाने दिला आहे. (शहर वार्ताहर)
दिवाळीत सहा हजार किलो खव्याची आयात
By admin | Updated: October 27, 2016 00:58 IST