वणी : सध्या मार्केटिंगचा जमाना आहे. बहुतांश जण प्रसिद्धीच्या मागे लागलेले आहे. त्यामुळे वणी, मारेगाव, झरीजामणी तालुक्यातील प्रमुख शहरे आणि गावांमध्ये जागोजागी होर्डींग्ज आणि फ्लेक्स लागलेले आहेत. ते शहर आणि गावांचे सौंदर्यच नष्ट करीत आहेत. शहर आणि गावांचे विद्रुपीकरण होत आहे.आधुनिक युगात जाहीरातींना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. मात्र पूर्वी केवळ एखाद्या वस्तूची अथवा ठिकाणाची प्रसिद्धी केली जात होती. आता स्वत:चेच ‘मार्केटींग’ करण्याचे तंत्र सुरू झाले आहे. स्वत:ला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्याकडे सर्वांचा कल वाढला आहे. त्यासाठी होर्डींग्ज आणि फ्लेक्सचा सोपा पर्यांय त्यांना उपलब्ध झाला आहे. ते अत्यंत कमी किमतीत तयार करून मिळत असल्याने कुणीही उठसूट कुणाचाही वाढदिवस साजरा करण्यासाठी फ्लेक्सचा वापर करू लागले आहे. राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विविध शैक्षणिक संस्था, व्यावसायीक आदी होर्डींग्ज आणि फ्लेक्सच्या माध्यमातून स्वत:ची ओळख पटवून देण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. प्रसिद्धीसाठी ते जिवाचा आटापिटा करीत असल्याचे दिसून येत आहे. आपले नेते, त्यांचे वाढदिवस, जयंती, पुण्यतिथीनिमित्त मोठमोठे फ्लेक्स लावून त्यांच्याप्रती असलेली ‘निष्ठा’ प्रदर्शित करण्यात राजकीय पदाधिकारी आघाडीवर दिसतात. आपल्या नेत्याप्रती निष्ठा दर्शविण्यासाठी त्यांना ही पर्वणीच असते. आता नुकत्याच लोकसभा, विधानसभा निवडणूका आटोपल्या. त्यानंतर विजयी उमेदवारांच्या अनुयायांनी अनेक ठिकाणी फ्लेक्स, होर्डिंग्ज लावून आपण त्यांच्यासाठी किती मेहनत घेतली, हे दर्शविण्याचा प्रयत्न केला. सोबतच त्यातून त्यांनी आपण विजयी उमेदवाराच्या अत्यंत निकटस्थ असल्याचा संदेशही सर्वांना दिला. हा कित्ता सर्वच जण गिरवितात. त्याला कोणता पक्ष अपवाद नाही. अनेक नागरिकही अमूक मंत्री, तमूक खासदार, आमदारांचे याच माध्यमातून अभिनंदन करताना दिसतात. विशेष म्हणजे फ्लेक्स अथवा होर्डिंग्ज दिसणारे ते चेहरे बहुतांश नागरिकांनी कधीच बघितलेले नसतात. मात्र आपण त्यांच्या किती जवळचे आहोत हेच दर्शविण्यासाठी ते हा सर्व आटापिटा करतात.वणी, मारेगाव, झरीजामणी या तालुक्यांच्या ठिकाणी अनेक मोठे फ्लेक्स, होर्डींग्ज लागलेले दिसतात. याशिवाय या तीनही तालुक्यातील लहान-मोठ्या गावांमध्येही फ्लेक्सचे प्रमाण वाढले आहे. वणीतील जवळपास प्रत्येक चौकात होर्डिंग्ज आणि फ्लेक्स लागलेले दिसतात. वणीसह मारेगाव, झरी, मुकुटबन, करणवाडी, बोटोणी, भालर, नांदेपेरा, कुंभा, चिखलगाव, लालगुडा, आदी मोठ्या गावांमध्ये असे फलक, होर्डिंग्ज, फ्लेस लागलेले असतात. मात्र ते शहर आणि गावांच्या सौंदर्यालाच बाधा निर्माण करत आहेत. त्यांच्यामुळे सौंदर्य नष्ट होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
होर्डिंग्ज, फलकांमुळे विद्रुपीकरण
By admin | Updated: December 30, 2014 23:46 IST