विजय दर्डा : आफताब व्यायाम शाळेचे उद्घाटनयवतमाळ : शिक्षण आणि शिस्तीच्या जोरावरच आजपर्यंत सर्व देश पुढे गेले आहेत. चांगल्या सवयी आणि शिस्तच चांगले व्यक्तिमत्त्व घडविते. याठिकाणी आफताब क्रीडा मंडळाने पवित्र कार्य हाती घेतले असून व्यायामशाळेच्या माध्यमातून सशक्त व्यक्तीसोबतच सुसंस्कृत व्यक्ती घडेल, असे प्रतिपादन लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी केले. येथील कोहिनूर सोसायटीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या आफताब व्यायाम शाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुभाष राय होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, आफताब क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अब्दुल जाकीर, अन्वर लोढा, गफार खान, अभियंता आर.एम. क्षीरसागर, अॅड. रणजितसिंह बघेल, विलास देशपांडे उपस्थित होते. खासदार विजय दर्डा म्हणाले, आपल्या समाजाला तोडण्याचे काम काही मंडळी करीत असतात. येथे हिंदू-मुस्लीम कोणी नाही, आपण माणसं आहोत. आपण सर्व एकत्र आलो तर देश मजबूत होईल. त्यातून देशाचा विकास होईल. आपण आता सर्वांनी प्रगतीसाठी काम केले पाहिजे. यवतमाळने नेहमीच दिशा दिली आहे. चांगल्या कामात जिल्हा पुढे राहिला आहे. यापुढेही यवतमाळ विकासात निश्चितच अग्रेसर राहील, असे खासदार दर्डा म्हणाले.नगराध्यक्ष सुभाष राय म्हणाले, सुदृढ शरीरासाठी त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी ही व्यायामशाळा असून नागरिकांनी या व्यायामशाळेचा उपयोग घेवून सशक्त आणि सुदृढ समाज निर्माण करावा, असे आवाहन केले. आफताब क्रीडा मंडळ केवळ व्यायामशाळाच चालविणार नाही तर सोबत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करणार आहे. तसेच संगणकाचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची घोषणा यावेळी आयोजकांनी केली. यावेळी सिंधुदुर्ग येथे भारोत्तलनमध्ये सुवर्णपदक विजेता महंमद दानिश महंमद शकील याचा सत्कार खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक आफताब व्यायामशाळेचे सचिव प्रा. फिरोज खान यांनी, संचालन सैयद गजतफसर तर आभार सैयद इरफान यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर वार्ताहर)
सवयी आणि शिस्तच चांगले व्यक्तिमत्त्व घडविते
By admin | Updated: January 29, 2015 23:15 IST