बँकेवर प्रशासकासाठी पालकमंत्र्यांचा आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 05:00 AM2020-05-21T05:00:00+5:302020-05-21T05:00:17+5:30

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी २६ मार्च २०२० रोजी मतदान होऊ घातले होते. २१ पैकी दोन संचालक बिनविरोध निवडून आले. त्यामध्ये पुसद येथील विजयराव चव्हाण यांचे पुत्र आणि उमरखेड येथून माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांचा समावेश आहे. परंतु मतदानाच्या दोन दिवस आधी २४ मार्चला लॉकडाऊनमुळे ही निवडणूक स्थगित करण्यात आली.

Guardian Minister's insistence on bank administrator | बँकेवर प्रशासकासाठी पालकमंत्र्यांचा आग्रह

बँकेवर प्रशासकासाठी पालकमंत्र्यांचा आग्रह

Next
ठळक मुद्देआयुक्तांचा युक्तिवाद व्यर्थ : फाईल विधी व न्याय विभागाकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेल्या १२ वर्षांपासून एकच संचालक मंडळ कायम असलेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासक नियुक्त करा यासाठी राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड प्रचंड आग्रही आहेत. हा प्रशासक फार काळ टिकणार नाही अशी समजूत सहकार प्रशासनाने काढूनही पालकमंत्री काहीएक ऐकण्यास तयार नसल्याने अखेर प्रशासकाचा हा प्रस्ताव अभिप्रायासाठी विधी व न्याय विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी २६ मार्च २०२० रोजी मतदान होऊ घातले होते. २१ पैकी दोन संचालक बिनविरोध निवडून आले. त्यामध्ये पुसद येथील विजयराव चव्हाण यांचे पुत्र आणि उमरखेड येथून माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांचा समावेश आहे. परंतु मतदानाच्या दोन दिवस आधी २४ मार्चला लॉकडाऊनमुळे ही निवडणूक स्थगित करण्यात आली. दरम्यान पालकमंत्री संजय राठोड यांंनी या बँकेवर प्रशासक नियुक्त करावा म्हणून दोन आठवड्यांपूर्वी शासनाला पत्र दिले आहे. या पत्राच्या अनुषंगाने अमरावतीचे विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) आणि सहकार आयुक्तांनी पालकमंत्र्यांना वास्तव सांगण्याचा प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बँकेची निवडणूक घेतली जात आहे, शासनाने सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाला सहा महिने मुदतवाढ दिली आहे, बँकेवर प्रशासक फार काळ टिकणार नाही, नियुक्त झाला तरी त्याला फारसे अधिकार राहणार नाही, निवडणूक कोणत्याही क्षणी लागू शकते आदी मुद्यांची जाणीव करून दिली. परंतु पालकमंत्र्यांचा बँकेवर प्रशासक नियुक्तीचा आग्रह कायम आहे. त्यामुळे या प्रकरणाची फाईल मुंबई उच्च न्यायालयाच्या सरकारी अभियोक्त्यांकडे पाठविली गेली. तेथून ही फाईल आता विधी व न्याय विभागाकडे अभिप्रायासाठी गेली आहे. फाईलींचा हा प्रवास बँकेची निवडणूक लागेपर्यंत टाईमपास तर नव्हे ना अशी शंकाही बँकेच्या वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. आता बँकेची निवडणूक लागते की, प्रशासक नियुक्त करण्यात पालकमंत्र्यांना यश येते याकडे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राच्या नजरा लागल्या आहेत.

लॉकडाऊनमध्येही मोबाईलद्वारे प्रचार
दोन महिन्यांपासून लॉकडाऊन असले तरी जिल्हा बँक संचालक पदाच्या निवडणुकीत नशीब आजमाविणाऱ्या काहींनी या काळातही आपला प्रचार मोबाईलद्वारे सुरू ठेवला आहे. काही उमेदवार दररोज कधी थेट मतदाराला तर कधी मतदारांचा समूह सांभाळणाºया नेत्याला संपर्क करतात. काहींनी प्रत्यक्ष गावात जाऊन मतदारांच्या भेटी-गाठी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु काही गावात या उमेदवारांना एन्ट्रीच रोखली गेली, लॉकडाऊन संपल्यानंतर प्रचाराला या असा प्रेमाचा सल्लाही दिला गेला. ग्रामीण भागात काही प्रमाणात प्रचार होत असला तरी शहरी भागात बँकेच्या या उमेदवारांना शून्य प्रतिसाद आहे. कारण शहरात मतदार घराचे दार तर दूर फाटकही उघडत नसल्याचा अनुभव काहींना आला. मोबाईलवर प्रचार मात्र सुरू आहे.

१० जूनपर्यंत मतदान होण्याचा अंदाज
कोरोना संसर्गाच्या भीतीने शासनाने जाहीर केलेला चौथा लॉकडाऊन ३१ मे रोजी संपणार आहे. त्यानंतर लॉकडाऊन वाढण्याची चिन्हे नाहीत. ते पाहता १० जूनपर्यंत निवडणुकीचा उर्वरित कार्यक्रम जारी होऊन तो पूर्ण केला जाईल, असा संचालकांचा अंदाज आहे. मतदानाच्या दोन दिवसपूर्वीच निवडणूक प्रक्रिया थांबली होती. त्यामुळे आता जास्तीत जास्त पाच-सहा दिवसांचा अवधी मतदानापूर्वी मिळू शकतो अशी शक्यताही वर्तविली जात आहे. १० जून दरम्यान मतदान घेतले गेल्यास पालकमंत्र्यांचे प्रशासक नेमण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Guardian Minister's insistence on bank administrator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.