लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव (यवतमाळ) : दहा रुपयांची मागणी पूर्ण न केल्याने बाजेवर झोपून मृत असलेल्या आजीवर लाकडी दांडक्याने डोक्यावर, तोंडावर हल्ला चढवून खून केला. ही घटना महागाव तालुक्यातील सुधाकरनगर, पेढी (ई) येथे बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
कोंडीबाई बालचंद जाधव (वय ८५) असे मृत आजीचे नाव आहे. श्याम उत्तम जाधव (१८) असे मारेकरी नातवाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्याम जाधव हा आजीसोबत राहत होता. सकाळी नेहमीप्रमाणे त्याने आजीकडे १० रुपयांची मागणी केली. आजीने पैसे देण्यास नकार दिल्याचा राग तो मनात धरून होता. आजी घरात झोपून असल्याची संधी साधून त्याने लाकडी दांड्याने आजीच्या डोक्यावर आणि तोंडावर हल्ला चढवला. यात कोंडीबाई जाधव रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड, महागावचे ठाणेदार धनराज निळे व पथकाने घटनास्थळी दाखल होत आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी सोनालाल उत्तम जाधव (२६) याने महागाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपी श्याम जाधव याच्याविरुद्ध कलम १०३ (१) बीएनएस अन्वये गुन्हा नोंदवला. महागाव तालुक्यात एकाच आठवड्यात खुनाची ही दुसरी घटना घडली आहे. यापूर्वी लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना माळकिनी येथे घडली होती.