लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले, निवडणुका संपल्यानंतर या आश्वासनाचा सरकारला विसर पडला. खरं तर शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे. सरकार या अत्यंत संवेदनशील विषयात आंधळ्याचे सोंग घेत असल्याची खरमरीत टीका 'प्रहार'चे नेते बच्चू कडू यांनी केली.
अमरावती जिल्ह्यातील पापळ येथून सुरू झालेल्या सातबारा कोरा पदयात्रेचा समारोप आठव्या दिवशी सोमवारी महागाव तालुक्यातील अंबोडा येथे झाला. याप्रसंगी ते बोलत होते. मंचावर प्रसिद्ध सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज, आमदार रोहित पाटील, माजी आमदार ख्वाजा बेग उपस्थित होते. सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. येथे उपस्थित राहिल्याने तुमचे ना नाव येणार होते, ना गाव येणार होते, तरीही लोकचळवळ म्हणून विश्वासाने उपस्थित राहिलात, माझ्याबरोबर १३८ किलोमीटर चाललात, या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. यापुढे मरेपर्यंत शेतकरी आणि शेतकऱ्यांसाठी संघर्ष करीत राहीन, अशी ग्वाही कडू यांनी दिली. शेतकऱ्यांच्या मनामध्ये सरकारविरोधात संताप आहे. कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचे दुःख हलके करण्याची संधी असताना सरकार वेळकाढूपणा करीत आहे. कर्जमाफीतून सरकारला सुटी देणार नाही, याच मागणीसाठी येत्या २४ जुलै रोजी संपूर्ण राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचीघोषणा बच्चू कडू यांनी केली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पाटील यांनीही शेतकऱ्यांशी संवाद साधला.
नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर तीन तास चक्का जामसातबारा कोरा पदयात्रेत सहभागी होण्यासाठी विविध जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात शेतकरी अंबोडा येथे दाखल झाले होते. काही शेतकरी ट्रॅक्टर घेऊन पदयात्रेत सहभागी झाले होते. तर काहींच्या हातात लाठ्याकाठ्यांसह रुमणे होते. या शेतकऱ्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करीत महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे तीन तास ठप्प झाली होती.
चिलगव्हाण येथे शेतकरी कुटुंबाशी साधला संवाद१९ मार्च १९८६ रोजी चिलगव्हाण येथील साहेबराव करपे या शेतकऱ्याने सहकुटुंब आत्महत्या केली होती. राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून याची नोंद आहे. पदयात्रा निघाल्यानंतर बच्चू कडू यांनी चिलगव्हाण येथे जाऊन शेतकरी कुटुंबीयांशी संवाद साधला. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सत्यपाल महाराजही आवर्जून अंबोडा येथे आले होते.