संजय राठोड : जिल्हास्तरीय वीज वितरण नियंत्रण समितीची बैठक यवतमाळ : शेतकऱ्यांच्या दृष्टीने वीज जोडणी अतिशय महत्त्वाची आहे. मागेल त्या शेतकऱ्यांसह सामान्य ग्राहकाला तातडीने वीज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा सुविधा तसेच उपकेंद्राची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवून त्याप्रमाणे कामे करा, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.बचत भवन येथे जिल्हास्तरीय वीज वितरण व नियंत्रण समितीची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. बैठकीला खासदार भावना गवळी, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार डॉ. अशोक उईके, जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, वीज वितरणचे मुख्य अभियंता रंगारी, अधीक्षक अभियंता विजय भटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड आदी उपस्थित होते.जिल्ह्यात नवीन उपकेंद्र तसेच आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण झाल्याशिवाय वीज कनेक्शन देण्यातील अडथळे दूर होणार नाही. त्यामुळे वीज कनेक्शनचे काम सातत्याने सुरु ठेवण्यासोबतच पायाभूत सुविधांनाही प्राधान्य देणे आवश्यक आहे. मंजूर तथा प्रस्तावित वीज उपकेंद्रांसह वीजवाहिन्या तसेच आवश्यक बाबींनाही सातत्याने पुढे नेणे आवश्यक आहे. या कामांना गती देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करून त्याप्रमाणे काम करा. ज्या उपकेंद्रांना मुंबई स्तरावर मंजुरी अडली आहे, तेथे पालकमंत्री म्हणून पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्री राठोड म्हणाले. जिल्ह्यात वीज वितरणचे केवळ तीन विभाग आहे. जिल्ह्याचा विस्तार पाहता ग्राहकांना चांगल्या आणि जलद गतीच्या सुविधा देण्यासाठी दारव्हा आणि वणी हे दोन विभाग प्रस्तावित करा. या प्रस्तावांना शासनाकडून मंजुरी प्राप्त करून देऊ. शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यासाठी विशेष बाब म्हणून ५७ कोटी रुपये शासनाने उपलब्ध करून दिले आहे. हा निधी तातडीने उपयोगात आणा. पुन्हा नव्याने निधी उपलब्ध करून देऊ, असे पालकमंत्री म्हणाले. वीज कनेक्शन वेळेत उपलब्ध होत नसल्याने नाईलाजास्तव काही ग्राहक आकोडे टाकून वीज घेत असल्याने वीजचोरीचे प्रमाण दिसून येते. या ग्राहकांना तातडीने कनेक्शन दिल्यास अशी चोरी होणार नाही. त्यामुळे ग्राहकांमध्ये तातडीने वीज कनेक्शन दिले जात असल्याची भावना निर्माण करा. त्यांच्यात तशी जनजागृती करा. पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत मंजूर निधीतून कामाचे चांगले नियोजन करण्यासोबतच या योजनेतून जिल्ह्याला जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही पालकमंत्री संजय राठोड यांनी बैठकीत दिले. (प्रतिनिधी)
वीज विकासाची कामे वेळेत करा
By admin | Updated: October 19, 2015 00:22 IST