घरघर : कारखाना सुरू होण्याची शक्यता कमी लोकमत न्यूज नेटवर्क महागाव : शेतकरी कारखानदार झाला पाहिजे, या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याला अखेरची घरघर लागली आहे. वर्षभरापूर्वी अविरोध निवड झालेल्या संचालक मंडळानेही कारखाना सुरळीत होण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाही. परिणामी आगामी गळीत हंगामात हा कारखाना सुरू होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे वसंत सहकारी साखर कारखाना आहे. उमरखेड, पुसद, महागाव, हिमायतनगर, हदगाव या पाच तालुक्यात कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. गत काही वर्षांपासून हा कारखाना तोट्यात जात आहे. विविध कारणांनी कारखाना अधोगतीला जात असताना उपाययोजना होत नाही. गतवर्षी कारखान्याची परिस्थिती नाजूक असल्याने संचालक मंडळाची अविरोध निवड झाली. कारखाना इतिहासातील ही पहिली घटना होती. अनुभवी आणि संघर्षशील अध्यक्ष आणि संचालक या कारखान्यावर जनतेने पाठविले. आता या कारखान्याची अवस्था सुधारेल, अशी अपेक्षा होती. परंतु गतवर्षी जेमतेम गाळप करून कारखाना बंद झाला. आता अध्यक्षांच्या नाकर्तेपणामुळे आणि राजकीय हेवेदावे पुढे येत असल्याने हा कारखाना सुरू होण्याची कोणतीही शक्यता नाही. कारखान्याचे अध्यक्षांच्या मातोश्री नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या. त्यामुळे अध्यक्षांना इकडे वेळ देणे शक्य दिसत नाही. ऊस उत्पादक पूर्णत: वाऱ्यावर आहे, तर दुसरीकडे गुंज येथील खासगी साखर कारखाना शेतकऱ्यांना प्रोत्साहन देवून ऊस लागवडीसाठी मार्गदर्शन करीत आहे. तर सहकारातील वसंत साखर कारखाना अधोगतीकडे जात आहे. हा कारखाना चालविणाऱ्या संचालकमंडळात एकवाक्यता दिसत नाही. काही संचालक कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची भाषा करीत आहे, तर काही जण विरोध करून आत्मदहनाचा इशारा देत आहे. सर्व संचालकांनी एकत्र येऊन कारखाना कसा सुरू करता येईल, यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
‘वसंत’चे भविष्य अधांतरी
By admin | Updated: May 15, 2017 01:01 IST