पुसद : बहिणीस फोनवरून उद्धट बोलणाऱ्याला जाब विचारण्यास गेलेल्या इसमावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपीला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी चार वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे. भीमाशंकर गणपत लवटे (३५) रा. विडूळ ता. उमरखेड असे आरोपीचे नाव आहे. तर माधव रामजी शेटेवार (४५) रा. विडूळ असे जखमीचे नाव आहे. आरोपी भीमाशंकर हा माधव शेटेवार यांच्याकडे कामाला होता. १५ नोव्हेंबर २००६ रोजी भीमाशंकरने माधवच्या घरी फोन करून त्याच्या बहिणीस उद्धटपणे बोलला. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी माधव दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता भीमाशंकरच्या घरी गेला. त्यावेळी भीमाशंकरने माधवच्या पोटावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. तर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. त्यानंतर उमरखेड पोलिसांनी आरोपी भीमाशंकर लवटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. या प्रकरणात सहायक सरकारी वकील अॅड. सुधाकर राठोड यांनी ११ साक्षीदार तपासले. युक्तीवादाअंती गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपी भीमाशंकर याला चार वर्ष सक्त मजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी वकिलांना अॅड. श्यामसुंदर यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)