- सुरेंद्र राऊतयवतमाळ - मुरूमाची वाहतूक करण्याची अधिकृत राॅयल्टी असतांनाही महसूल पथकाने ४० हजार रुपये लाचेची मागणी केली. ट्रॅक्टर मालकाने १७ हजार राेख आणून दिले. ही घटना २१ जुलै राेजी घडली. त्यानंतर ट्रॅक्टर चालकाने एसीबीकडे २२ जुलै राेजी तक्रार दिली. त्यावरून एसीबीने २३ जुलै राेजी पडताळणी करून गुरूवारी २४ जुलै राेजी सापळा लावला. बागवाडी येथील बस्थानकाजवळ वाघई मंदीर परिसरात खासगी व्यक्तीने लाच स्वीकारली. त्यानंतर एसीबीने लाच मागणाऱ्या चार महसुल अधिकाऱ्यांना अटक केली.
मंडळ अधिकारी जितेंद्र पांडुरंग ठाकरे (५७ रा. नातुवाडी, दारव्हा),ग्राम महसुल अधिकारी जय गणेश साेनाेणे (२६ रा. पांढरकवडा), ग्राम महसुल अधिकारी पवन तानसेन भितकर (३० रा. अंबिकानगर दारव्हा), ग्राम महसुल अधिकारी नीलेश भास्कर तलवारे (३० इंदिरानगर लाडखेड), खाजगी इसम अशाेक श्रावण रणखांब (६० रा. हरु ता. दारव्हा) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. मंडळ अधिकारी व तीन ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) यांनी २१ जुलै राेजी दारव्हा येथे मुरूमाची वाहतुक करताना बंद पडलेल्या ट्रॅक्टरवर कारवाईचा धाक दाखविला. ट्रॅक्टर मालकाने मुरूम वाहतुकीची राॅयल्टी दाखवूनही पथक जुमान नव्हते. त्यांनी थेट ४० हजाराची लाच मागितली. ट्रॅक्टर मालकाने तेव्हाचे पैशाची तजवीज करून १७ हजार रुपये दिले. मात्र नंतरही उर्वरित पैैशासाठी तगादा सुरू हाेता. ट्रॅक्टर मालकाने महसूल अधिकारी लाच मागत असल्याची तक्रार एसीबीला दिली. त्यानंतर यवतमाळ एसीबी पथकाने बुधवारी तक्रारीची पडताळणी करून गुरूवारी दुपारी सापळा लावला. लाचेची रक्कम स्विकारताना अशाेक रणखांब याला रंगेहात अटक केली. त्यानंतर मंडळ अधिकारी व चार ग्राम अधिकारी तलाठी कार्यालयातून पकडण्यात आले. या करवाईमुळे महसुल विभागात खळबळ उडाली आहे.
ही कारवाई पाेलिस निरीक्षक अर्जुन घनवट, पोलीस निरीक्षक मनोज ओरके, जमादार अतुल मते, अब्दुल वसीम, राकेश सावसाकडे, गोवर्धन वाढई, भागवत पाटील, सुरज मेश्राम, चालक अतुल नागमोते यांच्या पथकाने केली. पुढील तपास पाेलिस निरीक्षक अर्जुन घनवट, करीत आहेत.