महागाव : तालुक्यातील २७ गावातील पाण्याचे नमुने तपासणी होऊन आले असून, ते फ्लोराईडयुक्त असल्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तालुका आरोग्य अधिकारी वीरेंद्र श्रीवास्तव यांनी संबंधित ग्रामपंचायतींना स्वच्छतेसाठी अलर्ट केले आहे. परंतु त्यांच्या इशाऱ्याला बहुतांश ग्रामपंचायतींनी गांभिर्याने घेतलेच नाही. त्यामुळे सध्या गावागावात तापाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालये हाऊसफूल झाली आहे. महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रोज २०० रुग्णांची नोंद होत आहे. तालुक्यातील काळी दौ., फुलसावंगी, पोहंडूळ आणि सवना येथील शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या दुपटीने वाढली आहे. सध्या तालुक्यातील रुग्णसंख्येचा आढावा घेतला असता वास्तव अतिशय गंभीर आहे. तापाच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. घरा शेजारी साचलेले पाणी, सांडपाण्याच्या नाल्या व दुर्गंधी यामुळे मोठ्याप्रमाणात ग्रामीण भागात डासांची पैदास होत आहे. साचलेल्या पाण्यात गप्पी मासे आरोग्य विभागाने सोडले आहे. डेंग्यूच्या रोकथामीसाठी ग्रामपंचायतीने स्वच्छता राखण्यामध्ये पुढाकार घेण्याची गरज असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. महागाव, उटी, गुंज, माळकिन्ही, बोथा, धारमोहा, करंजखेड, माळकिन्ही तांडा, वाकोडी, फुलसावंगी, पिंपळगाव, बिजोरा, टेंभूरदरा, आमणी बु., पिंप्री, नांदगव्हाण, काळी दौ., सेवानगर, खामलवाडी, पोहंडूळ, कोनदरी, धनोडा, वाघनाथ, नगरवाडी या गावांमधील पाण्याचे नमुने फ्लोराईडयुक्त असल्याचा प्रयोगशाळेचा अहवाल १६ सप्टेंबर रोजी आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. हे पाणी पिण्यास उपयुक्त नसून या पाण्यामुळे दात आणि हाडांच्या तसेच तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे दुषीत आणि फ्लोराईडयुक्त पाणी वापरावर निर्बंध लावण्यात आले आहे. परंतु ज्या गावांमध्ये पाण्याची पर्यायी व्यवस्था नाही अशा ठिकाणच्या नागरिकांना विविध आजारांना बळी पडावे लागत आहे. (शहर प्रतिनिधी)
२७ गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाणी पुरवठा
By admin | Updated: September 18, 2014 23:41 IST