वडकी : घरातील कर्त्या व्यक्तीचा दुर्दैवी अंत झाल्याने कारेगाव येथील पाच कुटुंबांचा आधार गेला. पाचही जणांवर बुधवारी एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळच्या आक्रोशामुळे वातावरण सुन्न झाले होते. कुणाचे वडील, कुणाचा मुलगा तर कुणाचा भाऊ काळाने हिरावून नेला. संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले होते. उघड्यावर आलेल्या या पाचही जणांच्या कुटुंबाला आता मदतीचा हात हवा आहे. राळेगाव तालुक्याच्या कारेगाव येथील सार्वजनिक विहिरीतील गाळ उपसताना घडलेल्या घटनेत पाच तरुणांचा दुर्दैवी अंत झाला. यात विजय पुरुषोत्तम नंदूरकर (४५), भूपेश कवडू कुडमते (३०), आशिष तुकाराम मडावी (३५), शंकर रमेश जोगी (३२), गणेश राजू नंदूरकर (२५) यांचा समावेश आहे. या सर्व जणांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अतिशय गरीब कुटुंबातील या व्यक्ती आहेत. त्यांचा उदरनिर्वाह रोजमजुरी करून चालत होता. यातून सर्वच कुटुंबाचे आधार होते. त्यांच्यावर काळाने झडप घातल्याने कुटुंब पोरके झाले आहे. वृद्ध आई-वडील, पत्नी, चिलेपिले यांचा आक्रोश हृदय हेलावून सोडणारा होता. अंत्यसंस्कार प्रसंगी प्रशासनातर्फे तहसीलदार सुरेश कव्हळे, वडकीचे ठाणेदार अमोल माळवे, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, तलाठी गिरीश खडसे आदी उपस्थित होते. प्रसंगी तहसीलदार व बीडीओंनी प्रत्येक कुटुंबाला तत्काळ मदत दिली. यावेळी विलास राऊत, मनोज भोयर, हेमंत वाभिटकर, डॉ.इंगोले, डॉ.अशोक जवादे, अशोक केवटे, डॉ.तेलतुंबडे, अंकुश मुनेश्वर आदी उपस्थित होते.पाच कुटुंबावर अचानक कोसळलेल्या दु:खामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी या ठिकाणी तळ ठोकून होते. वैद्यकीय अधिकारी अशोक बोबडे हे आरोग्यसेविका शेंडे, मडकाम, शेषराव बोरपे यांच्यासह दाखल झाले होते. (वार्ताहर)पदाधिकाऱ्यांविषयी नाराजीकारेगावातील या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. मात्र परिसरातील कुठल्याही विद्यमान लोकप्रतिनिधीने दु:खात बुडालेल्या कुटुंबाची भेट घेण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्यामुळे त्यांच्याप्रति गावकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त केली जात होती. दरम्यान, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रा.वसंत पुरके यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये मदत दिली.
पाच कुटुंबांचा आधार गेला
By admin | Updated: April 1, 2015 23:57 IST