Coronavirus in Yawatmal; यवतमाळात म्युकरमायकोसिसचा पहिला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 01:51 PM2021-05-17T13:51:19+5:302021-05-17T13:51:38+5:30

Yawatmal news कोरोना रुग्णांमध्ये उद्‌भवणाऱ्या म्युकरमायकोसिस आजाराचे राज्यात दीड हजारांवर रुग्ण असून कित्येकांचा त्यात मृत्यूही झाला आहे. या मृत्यूमालिकेत आता यवतमाळचेही नाव जोडले गेले आहे.

First victim of mucormycosis in Yavatmal | Coronavirus in Yawatmal; यवतमाळात म्युकरमायकोसिसचा पहिला बळी

Coronavirus in Yawatmal; यवतमाळात म्युकरमायकोसिसचा पहिला बळी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

यवतमाळ : कोरोना रुग्णांमध्ये उद्‌भवणाऱ्या म्युकरमायकोसिस आजाराचे राज्यात दीड हजारांवर रुग्ण असून कित्येकांचा त्यात मृत्यूही झाला आहे. या मृत्यूमालिकेत आता यवतमाळचेही नाव जोडले गेले आहे. येथे म्युकरमायकोसिस या आजाराने ६० वर्षीय महिला रुग्णाचा शुक्रवारी १४ मे रोजी मृत्यू झाल्याची माहिती सोमवारी देण्यात आली.
यवतमाळात म्युकरमायकोसिसचे तीन रुग्ण असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयातून सांगण्यात आले. त्यापैकी ६० वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. एकावर उपचार सुरू आहे. तर दुसऱ्याला सुटी देण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय मात्र म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यात सात ते आठ रुग्ण असल्याचे सांगत आहे. अनियंत्रित मधुमेह, कॅन्सर, अशक्तपणा, स्टेरॉईडचा अधिक प्रमाणात वापर यामुळे हा आजार होत असल्याचे सांगण्यात आले. कोरोनाग्रस्त रुग्णाला स्टेरॉईडची औषधी दिली जाते. परंतु त्याचे प्रमाण जास्त झाल्यास म्युकरमायकोसिस हा आजार होण्याची शक्यता राहत असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले. या आजाराची संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेता वैद्यकीय महाविद्यालयात म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्डच तयार करण्याचे नियोजन आहे.

वणी विभागातही रुग्ण सापडला
जिल्ह्यातील वणी विभागातसुद्धा म्युकरमायकोसिसचा रुग्ण सापडला असून त्याला पुढील उपचारार्थ यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा रुग्ण ६५ वर्षाचा असून झरी तालुक्यातील बोपापूर भागातील रहिवासी आहे. त्याला वणी येथे ट्रामा केअर सेंटरमध्ये कोरोनाचे निदान झाल्याने उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. प्रकृती ठिक झाल्याने त्याला ९ मे रोजी सुटी देण्यात आली होती. परंतु त्यानंतर घरी त्याला त्रास वाढल्याने १५ मे रोजी तो पुन्हा वणी येथे शासकीय रुग्णालयात आला. तेथे त्याचे सीटी स्कॅन केले असता म्युकरमायकोसिस या आजाराची सुरुवात झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याला यवतमाळला हलविण्यात आले.

Web Title: First victim of mucormycosis in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.