ऑनलाईन लोकमतयवतमाळ : सिग्नल सुटल्यानंतर झालेल्या गोंधळात भरधाव ट्रकने दुचाकीला अक्षरश: चिरडल्याने वयोवृद्ध सासरे जागीच ठार, तर सुनेची मृत्यूशी झुंज सुरू आहे. हा अपघात अत्यंत वर्दळीच्या यवतमाळ बसस्थानक चौकात शनिवारी दुपारी ३.१५ वाजता घडला. घटनास्थळावरील सुनेचा तुटून पडलेला पाय आणि रक्तमासाचा सडा अंगावर शहारे आणणारा होता. या भीषण अपघातातही दोन वर्षांची चिमुकली सुदैवाने बचावली. अपघातानंतर बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती.डॉ. वामनराव कवडू हेपट (६७) रा. पुष्पकुंज सोसायटी यवतमाळ असे मृताचे नाव आहे, तर अंजली समीर हेपट (२८) असे गंभीर जखमी झालेल्या सुनेचे नाव आहे. या अपघातात माही समीर हेपट (२) ही चिमुकली आश्चर्यकारकरीत्या बचावली. यवतमाळच्या आयुर्वेद महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेले डॉ.वामनराव हेपट शनिवारी दुपारी दुचाकीने (क्र.एम.एच.२९-एपी-८७४७) आपली सून अंजली व नात माहीसोबत जात होते. दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास दारव्हा मार्गावरील सिग्नल सुटल्यानंतर एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला अक्षरश: चिरडले. १५ ते २० फूट दुचाकीला फरफटत नेले. त्यात चाकाखाली येऊन डॉ. वामन हेपट यांचा जागीच मृत्यू झाला, तर सून अंजली यांच्या पायावरून ट्रकचे चाक गेल्याने पाय कंबरेपासून तुटून पडला. या भीषण अपघातात दोन वर्षीय माही मात्र आश्चर्यकारकरित्या बचावली. अपघात होताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. घटनास्थळावर तुटून पडलेला पाय पाहून अनेकांचा थरकाप उडाला होता. या घटनेनंतर चौकातच असलेल्या वाहतूक पोलिसांनी धाव घेतली. जखमी अंजलीला तत्काळ यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या अंजलीची मृत्यूशी झुंज सुरू आहे.सिग्नलचा कालावधी ठरतो काळआर्णी मार्गाचे खोदकाम सुरू असल्याने तो पूर्णत: बंद आहे. शहरातील इतरही रस्ते बंद असून बसस्थानक चौकातून जाण्याशिवाय पर्याय नाही. गेल्या काही दिवसांपासून बसस्थानक चौकातील सिग्नलचा अवधी हा कमी केला आहे. यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडत आहे. यातूनच हा अपघात झाला. आत्तापर्यंत सिग्नलवर मागून गाडीला धडक दिल्याच्या घटना सातत्याने घडत आहे. परंतु अर्थकारणात व्यस्त असलेल्या वाहतूक पोलिसांना याचे सोयरसूतक नाही.बसस्थानक चौक मृत्यूचा सापळाशहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा टेंबा मिरवणाऱ्या वाहतूक शाखेचे भरदिवसा शहरातून जाणाºया जड वाहनांकडे पूर्णत: दुर्लक्ष आहे. बसस्थानक चौकातील सिग्नल हा मृत्यूचा सापळा बनला आहे. येथे आत्तापर्यंत अनेकांचा बळी गेला, तर कित्येकांना कायमस्वरूपी अपंग केले आहे. त्यानंतरही या चौकातील कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस रस्त्याच्याकडेला उभे राहून बघ्याच्या भूमिकेत असतात. या घटनेने सर्वसामान्य यवतमाळकर प्रचंड संताप व्यक्त करीत होते. अपघातस्थळावर मोठी गर्दी जमली होती. प्रतिबंध असताना जड वाहने गावात कुणाच्या आशीर्वादाने शिरतात, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.अंजलीच्या भावाचाही अपघाती मृत्यूगंभीर जखमी झालेल्या अंजलीच्या भावाचा गतवर्षी गुढीपाडव्या दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील पडोळी येथे अपघातात मृत्यू झाला होता,तर अंजलीचे पती समीर याचा दोन वर्षापूर्वी खून झाला होता. आता अपघातात सासरे ठार झाले आणि अंजलीची मृत्यूशी झुंज सुरू आहे. हेपट कुटुंबातील एकमेव चिमुकली माही मागे आहे.माहीचा विलाप शहारे आणणाराअपघातातून आश्चर्यकारकरीत्या बचावलेल्या चिमुकल्या माहीचा विलाप अंगावर शहारे आणणारा होता. घटनास्थळावर आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आणि आजोबा जागेवरच गतप्राण झालेले दृश्य माहिने बघितले. ती मोठ्याने हंबरडा फोडून रडू लागली. जमलेल्या गर्दीत एकही चेहरा ओळखीचा दिसत नव्हता. शेवटी माहीला तिच्या जखमी आईसोबत शासकीय रुग्णालयात आणले. यावेळी महिला पोलीस शिपायाने तिला जवळ घेत धीर देण्याचा प्रयत्न केला. माहीचा विलाप पाहून अनेकांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या होत्या.
सिग्नलवर सासरे ठार, सून गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 22:18 IST
सिग्नल सुटल्यानंतर झालेल्या गोंधळात भरधाव ट्रकने दुचाकीला अक्षरश: चिरडल्याने वयोवृद्ध सासरे जागीच ठार, तर सुनेची मृत्यूशी झुंज सुरू आहे. हा अपघात अत्यंत वर्दळीच्या यवतमाळ बसस्थानक चौकात शनिवारी दुपारी ३.१५ वाजता घडला.
सिग्नलवर सासरे ठार, सून गंभीर
ठळक मुद्देट्रकने दुचाकीला चिरडले : बसस्थानक चौकातील घटना, चिमुकली सुखरूप