व्याजावर व्याज : अवैध सावकारीचा व्यवसाय तालुक्यात फोफावलाउमरखेड : गेल्या महिन्यात तालुक्यात पुन्हा एकदा अवैध सावकारीचा व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. उमरखेड शहरासह ढाणकी, बिटरगाव, मुळावा, पोफाळी, विडूळ, सुकळी, दराटी, निंगनूर या भागात मोठ्या प्रमाणात अवैध सावकारांनी आपले जाळे पसरविले आहे. यामुळे शेतकरी मात्र त्रस्त आहे.अव्वाच्या सव्वा टक्केवारीने शेतकऱ्यांच्या असहाय्यतेचा लाभ घेत त्यांना कर्ज देण्यात येते. आणि नंतर मात्र वसुलीसाठी त्यांच्या मागे तगादा लावला जातो. नापिकी, निसर्गाचा लहरीपणा, मालाला भाव नसणे अशा सर्व संकटांसोबत शेतकऱ्याला अवैध सावकाराच्या जाचाचाही त्रास सहन करावा लागतो. खरिपाचे पीक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून त्या पिकाच्या भरोशावरच त्यांचे वर्षभराचे नियोजन असते. खरीप हंगामातील सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांजवळ पैसा नसतो. म्हणून ते अशावेळी बँकांमध्ये फेऱ्या मारतात. परंतु त्या ठिकाणीही कर्ज न मिळाल्यास जवळचे असले नसले ते पैसे खर्च करतो. प्रसंगी असल्यास सोनेही मोडतो. त्यानंतरही काही न जमल्यास नाईलाजास्तव सावकाराच्या दारात जातो. अशावेळी शेतकरी चांगलेच अडवून घेतो. उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांची स्थिती यावर्षी जेमतेम असताना वर्षभराचे नियोजन कसे करावे आणि त्यातच अवैध सावकाराचे व्याजावर व्याज लावलेले कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत शेतकरी सध्या आहे. तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात भिस्त असलेल्या सोयाबीन पिकाने चांगलाच झटका दिला आहे. विडूळ, ढाणकी, बिटरगाव, दराटी व निंगनूरसह इतर काही परिसरात सोयाबीनचे उत्पादन अत्यल्प झाले आहे. परतीच्या पावसाचा झटका आणि वाचलेल्या सोयाबीन व कपाशीच्या पिकांवर झालेली रोगाची लागण यामुळे शेतकरी पुरता खचला आहे. त्यातच आता अवैध सावकारीच्या तगाद्याने तो त्रस्त झाला आहे. (शहर प्रतिनिधी)निसर्गाचा लहरीपणायावर्षी सुरुवातीला मृगाचा चांगला पाऊस झाला. पेरणीनंतर मात्र पावसाने एक-दीड महिना दांडी मारली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागला. पुन्हा परतीच्या पावसाचा झटका. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकऱ्याला सरासरी उत्पन्नात चांगलीच घट आली आहे.
सावकारांच्या तगाद्यामुळे शेतकरी त्रस्त
By admin | Updated: November 10, 2016 01:40 IST