सुरेंद्र राऊत यवतमाळ गाव बोथबोडन. शेतकरी आत्महत्यांसाठी कुुप्रसिध्द. गावात पाय ठेवताच आधुनिकतेची झलक दिसते. मात्र येथील प्रत्येक जण मनाने खचलेला आहे. गत बारा वर्षात गावातील ३६ शेतकऱ्यांनी या जगाचा निरोप घेतला. पॅकेजपासून मदतीपर्यंत सर्वकाही मिळत गेले. राहुल गांधीपासून श्री श्री रवीशंकरापर्यंत सर्वांनी भेट दिली. त्या उपरही येथील आत्महत्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. दोन दिवसापूर्वी झालेल्या शेतकरी आत्महत्येनंतर गावाला भेट दिली तेव्हा गावकऱ्यांच्या मनातील खदखद बाहेर आली. ‘साहेब, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी काँग्रेस सरकारने खूप काही दिले. मात्र आताच्या सत्ताधारी भाजपा- शिवसेनेचे नेते गावात फिरकलेही नाही. आम्हीच आमच्या प्रश्नांची उत्तर शोधतोय आणि येणार दिवस पुढे ढकलतोय’, असे गावकरी सांगत होते. यवतमाळ या जिल्ह्याच्या ठिकाणापासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर बोथबोडन आहे. डोंगर माथ्याच्या कुशीतील या गावात माळरानावरच्या मुरमाड, खडकाळ जमिनीची कुस उजविण्याचा संघर्ष येथे सुरू आहे. याच संघर्षात अनेकांनी आपले बलिदान दिले आहे. २००३ मध्ये येथील अतिशय उमदा व मनमिळावू शेतकरी विनोद राठोड या शेतकऱ्याने आत्महत्या केली. तेथून सुरू झालेले हे सत्र अद्यापही थांबले नाही. या गावाची अवस्था माध्यमांनी जगापुढे मांडली. सर्वांचे लक्ष बोथबोडनकडे वळले. त्यानंतर गावात अनेक व्हीव्हीआयपींचा रतीब सुरू झाला. कर्जासाठी बँक येथील शेतकऱ्यांना दारात उभी करत नव्हती, आता त्यांची कर्ज प्रकरणे मंजूर होऊ लागली. यातून अनेकांनी शेतात सिंचनाची सोय करण्याचा प्रयत्न केला. डोंगर माथ्यावर विहिरींनाही जेमतेम पाणी लागले. त्यामुळे केवळ हंगामी सिंचनाची सोय झाली. परंतु अपेक्षित उत्पन्नच येत नाही. वन्यप्राण्याचाही मोठा उपद्रव येथील शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. बोथबोडनच्या सिंचनाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मनपूर तलाव प्रकल्प हाती घेण्यात आला. मात्र गेल्या तीन वर्षांपासून त्याचे काम रखडले आहे. ७५ टक्के पूर्ण झालेला हा प्रकल्प १०० टक्के झाल्यानंतर तेथून शंभर ते दीडशे एकर क्षेत्रावर बारमाही सिंचनाची सोय होणार आहे. दुर्दैवाने या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी सत्ताधाऱ्यांकडून कोणतेही प्रयत्न होत नाही. विजय दर्डा यांच्या खासदार विकास निधीतून १० लाखांचे सामाजिक भवनशेतकरी विधवांसोबत दिवाळी साजरी करण्यास आलेल्या खासदार विजय दर्डा यांनी गावात सामाजिक भवन उभारण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर वर्षभराच्या आत गावात दहा लाख रुपयांचे सामाजिक भवन बांधण्यात आले. आज याचा उपयोग ग्रामस्थांना होत असल्याचे सरपंच दिनेश पवार यांनी सांगितले. राष्ट्रीय नेत्यांच्या दौऱ्यानंतर स्थानिक सक्रियकाँग्रेसचे राष्ट्रीय नेते बोथबोडन येथे येऊन गेल्यानंतर स्थानिक नेत्यांना जाग आली. तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी बोथबोडनला भेट देऊन शेतकरी विधवांसोबत दिवाळी साजरी केली. मात्र त्यानंतर मदत मागण्यासाठी गेलेल्या कॅन्सर रुग्णाची दखल घेतली नाही. केवळ वरिष्ठांकडून आदेश आल्यानंतर त्यांनी औपचारिकताच पूर्ण केली. यांनी दिल्या भेटी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर (२००७) श्रीश्री रविशंकर (२००७)यशोदा इन्स्टिट्युट केंद्रीय समिती, दिल्ली (२००५)काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, मार्गारेट अल्वा (१८ जुलै २००८) तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खासदार विजय दर्डा, तत्कालीन आमदार नीलेश पारवेकरतत्कालीन आमदार नंदिनी पारवेकर सहकारी मंत्री हर्षवर्धन पाटीलतत्कालीन पालकमंत्री नितीन राऊतअसे आहे बोथबोडन १७८० लोकसंख्या असलेल्या बोथबोडनमध्ये वर्ग २ जमीनधारक शेतकऱ्यांची संख्या १२५ च्या घरात आहे. तर वर्ग १ जमीनधारक २०० शेतकरी आहेत. गावातील अडीचशे शेतकरी अल्पभूधारक आहे. रोजगार हमी योजनेतून येथे सिंचन विहिरींचे काम सुरू आहे. पंचायत समिती सभापती गायत्री ठाकूर यांचे गाव असल्याने पंचायत समिती स्तरावर बहुतांश योजना येथे राबविण्यात आले आहे. येथे वन जमिनीवर अतिक्रमण करुन शेती कसणाऱ्यांची संख्या ७० इतकी आहे. अतिक्रमण नियमित केले जावे यासाठी या शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये अतिक्रमित जमीन कसणाऱ्या एकाही शेतकऱ्याचा समावेश नाही.
दिग्गजांची पायधूळ लागूनही शेतकरी आत्महत्या थांबेना !
By admin | Updated: July 18, 2015 02:14 IST