लोकमत न्यूज नेटवर्कवणी : गेल्या काही दिवसांपासून घोन्सा कोळसा खाणीत स्फोटाची तीव्रता वाढविली आहे. कोळशाचे अधिक उत्पादन काढण्याच्या मोहात करण्यात येणारे हे स्फोट गावकऱ्यांसाठी विनाशकारी ठरत आहे. स्फोटानंतर खाणीत मोठमोठे दगड थेट शेतात येऊन पडत असल्याने शेतकरी दहशतीखाली वावरत आहेत. सध्या रब्बीचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी, शेतमजूर शेतात राबत आहेत. अशातच घोन्सा कोळसा खाणीत दररोज मोठमोठे तीव्र स्वरूपाचे स्फोट केले जात आहेत. स्फोटानंतर आजूबाजूच्या शेतांमध्ये मोठमोठ्या दगडांचा खच येऊन पडत आहे. यातून जीवित हानी होण्याची भीती गावकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. घोन्सा कोळसा खाणीत गुरुवारी दुपारी ३:३० व त्यानंतर ४ वाजता लागोपाठ दोन स्फोट करण्यात आले. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, घोन्सा गावातील मुख्य मार्गावर असलेल्या दुकानांच्या ईमारतीचे शटर हादरत होते. त्यामुळे नागरिक भयभीत झालेत.
घरांच्या भिंतींना गेले तडेघोन्सा कोळसा खाणीतील भीषण स्फोटामुळे घोन्सा गावातील अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. या गावात पक्क्या घरांसह काही मातीची घरेदेखील आहेत. या स्फोटामुळे ही घरे कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. मागील महिनाभरापासून वेकोलिने घोन्सा कोळसा खाणीत स्फोटाची तीव्रता वाढविली असल्याचे गावकरी सांगतात.
ब्लास्टिंगच्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
- घोन्सा कोळसा खाणीत केल्या जाणाऱ्या स्फोटानंतर त्याचा धूर गावापर्यंत येतो. या प्रदूषणामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकांना श्वसनाचे आजार आता जडू लागले आहेत. मात्र वेकोलिचे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
- घोन्सा गावाजवळून विदर्भा नदी २ वाहते. या नदीतील पाणी जनावरे पितात. तसेच शेतपिकांनादेखील या नदीचे पाणी सिंचनासाठी वापरले जाते. परंतु घोन्सा कोळसा खाणीतील रसायनयुक्त प्रदूषित पाणी या नदीत सोडले जात आहे.
- या रसायनयुक्त पाण्यामुळे 3 नदीतील जीवांनादेखील धोका झाला आहे. हेच पाणी काही शेतकरी सिंचनासाठी वापरत असल्याने शेतीच्या उत्पादनावरही त्याचा परिणाम होत आहे. याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
- कोळसा खाणीमुळे या भागात धूळ प्रदूषणाचाही प्रश्न गंभीर बनत चालला आहे. धुळीचा प्रकोप होऊ नये म्हणून ज्या उपाययोजना करायला पाहिजे, त्या उपाययोजना वेकोलिकडून केल्या जात नाहीत.
३० दिवस तक्रारी करूनही कारवाई झालीच नाहीमागील ३० दिवसांपासून सायंकाळच्या वेळी हे दोनदा बारूदीचे स्फोट केले जात आहेत. यासंदर्भात गावकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या. मात्र या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही.
"गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून घोन्सा कोळसा खाणीत स्फोट घडविले जात आहेत. त्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. तक्रार करूनही उपयोग नाही."- दिलीप काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य, घोन्सा.