यवतमाळ : पुसद वनविभागांतर्गत खंडाळा येथून चोरटे सागवान घेऊन जाणारा ट्रक तेलंगाणातील भैसा नाक्यावर तेथील वनविभागाने पकडल्याने तस्करीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. पुसद वनविभागांतर्गत खुलेआम सागवान तोड व मराठवाडा, तेलंगाणात तस्करी सुरू आहे. महागाव वनपरिक्षेत्रातील दगडथर, चिल्ली येथे दोन आठवड्यापूर्वी वृक्षतोड झाली होती. या गुन्ह्याच्या तपासात महागावचे वनपरिक्षेत्र अधिकारी नाईकवाडे यांच्या नेतृत्वातील पथक तेलंगाणात गेले होते. तेथे त्यांनी या तस्करीबाबत चौकशी केली. मात्र महागाव नव्हेतर पुसद वनपरिक्षेत्रातील खंडाळा जंगलातून अवैध वृक्षतोड करून आणलेला माल निर्मल जिल्ह्यातील भैसा नाक्यावर पकडल्याचे तेथील वन अधिकाऱ्यांनी नाईकवाडे यांना सांगितले. ४०७ वाहनात हे सागवान चोरट्या मार्गाने तेलंगाणात नेले जात असताना निर्मल जिल्ह्यात पकडले गेले. या ट्रकमध्ये सागवानासोबतच कुटाराचे पोते जप्त करण्यात आले. या कुटारात लपवून हे सागवान नेले गेले. या प्रकरणी पुसदच्या सुभाष वार्डातील रहिवासी चालक विठ्ठल माने, निजामाबादचा सागवान दलाल ईकबाल या दोघांना अटक करण्यात आली. तर या वृक्षतोड व तस्करीचा म्होरक्या अप्प्या (रा. खंडाळा) हा फरार आहे. अखेर या दोन आरोपींना घेऊन महागावचे पोलीस पथक परतले. गुरुवारी या आरोपींना महागाव येथे न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना ३ जानेवारीपर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली. अप्प्या हा पुसद वनविभागातील अट्टल सागवान चोरटा आहे. वनविभागाच्या सर्वच अधिकाऱ्यांना त्याची माहिती आहे. मात्र कुणीही त्याला पकडण्यास पुढाकार घेत नाही. अप्प्या याचे खंडाळा जंगलातील ४०१ क्रमांकाच्या कंपार्टमेंटला लागूनच शेत आहे. या शेताच्या आड तो जंगलातील परिपक्व झाडांची कत्तल करून सागवान परप्रांतात पाठवितो. वनविभागातील अधिकाऱ्यांशी त्याचे ‘सलोख्याचे’ संबंध आहे. निर्मल जिल्ह्यात पकडले गेलेले सागवान हे अप्प्याने याच शेतानजीकच्या दरीतून तोडलेले होते. (जिल्हा प्रतिनिधी)
खंडाळ्यातील सागवान तस्करी तेलंगणात उघड
By admin | Updated: January 1, 2015 23:09 IST