निवडणुका होतात, लग्न चालतात, मग परीक्षाच का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 05:00 AM2021-03-12T05:00:00+5:302021-03-12T05:00:12+5:30

 मार्च २०२० पासून विचार करता वर्षभरात एमपीएससीची परीक्षा तब्बल सहा वेळा रद्द करण्यात आली. यापूर्वी ५ एप्रिल २०२०, त्यानंतर २६ एप्रिल, १३ सप्टेंबर, २० सप्टेंबर, ११ आक्टोबर २०२० रोजी परीक्षा घोषित होऊन ती रद्द करण्यात आली. आता १४ मार्च २०२१ ही तारीख ठरली होती. नियोजन झाले होते. पण दोनच दिवस शिल्लक असताना अचानक ही तारीखही रद्द केली.

Elections are held, marriages are held, then why not exams? | निवडणुका होतात, लग्न चालतात, मग परीक्षाच का नाही?

निवडणुका होतात, लग्न चालतात, मग परीक्षाच का नाही?

Next
ठळक मुद्दे‘एमपीएससी’ची परीक्षा ऐनवेळी रद्द : यवतमाळातील परीक्षार्थी तरुण-तरुणींचा संताप

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : रविवारी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने गुरूवारी जिल्ह्यातील परीक्षार्थ्यांनी सरकारसह आयोगावर प्रचंड संताप व्यक्त केला. कोरोनाच्या कठीण काळात निवडणुका होतात, राजकीय सभा होतात, लग्न समारंभही केले जात आहेत. मग एमपीएससीची परीक्षाच का होऊ शकत नाही, असा संतप्त सवाल या परीक्षार्थ्यांनी उपस्थित केला. संविधान चौकात एकत्र येऊन या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
विशेष म्हणजे राज्यात कोरोना असतानाही नुकतीच आरोग्य विभागाने परीक्षा घेतली. त्यात कुणाला कोरोना झाला नाही. यूपीएससीचीही परीक्षा झाली. मग एमपीएससीवरच गदा का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकीकडे मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. तर वयाने मोठे असणारे एमपीएससीचे विद्यार्थी मात्र कोरोनाच्या सपाट्यात सापडतील असा बहाणा करून परीक्षाच रद्द करण्यात आली. हजारो विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते. 

वर्षभरात सहा वेळा परीक्षा रद्द
 मार्च २०२० पासून विचार करता वर्षभरात एमपीएससीची परीक्षा तब्बल सहा वेळा रद्द करण्यात आली. यापूर्वी ५ एप्रिल २०२०, त्यानंतर २६ एप्रिल, १३ सप्टेंबर, २० सप्टेंबर, ११ आक्टोबर २०२० रोजी परीक्षा घोषित होऊन ती रद्द करण्यात आली. आता १४ मार्च २०२१ ही तारीख ठरली होती. नियोजन झाले होते. पण दोनच दिवस शिल्लक असताना अचानक ही तारीखही रद्द केली.

या परीक्षेसाठी मी खूप मेहनत घेतली होती. परंतु, अशा पद्धतीने अचानक परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊन एमपीएससी आमच्यासारख्या परीक्षार्थ्यांची मानसिकता बिघडवण्याचे काम करीत आहे. कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून आम्हाला ही परीक्षा देता आली असती व प्रशासनालाही सहज परीक्षा घेता आली असती. 
- कुणाल लोंदे, 
परीक्षार्थी,  यवतमाळ
 

यावेळीची परीक्षा कोणत्याही स्थितीत घेणे आवश्यकच होते. कारण ती ऑलरेडी वर्षभर लेट झाली आहे. २०२० मध्ये नियोजित परीक्षा आपण २०२१ मध्ये कंडक्ट करतोय. तीही रद्द करून आमचा मानसिक छळ चालविण्यात आला आहे. आरोग्य विभागाची परीक्षा तुम्ही घेऊ शकता तर एमपीएससीची का नाही? पुढे परीक्षा कधी घेणार तेही तुम्हाला घोषित करता येत नाही, यापेक्षा दुसरे दुर्दैव कोणते?       - निखिल घोगरे, 
                       परीक्षार्थी, यवतमाळ

इतर परीक्षा होतात मग एमपीएससी का नाही ?

सध्याच यूपीएससीची परीक्षा झाली. आरोग्य विभागाची परीक्षा झाली. मग एमपीएससीचीच परीक्षा का नाही?  वर्षभरात चार वेळा परीक्षा स्थगित केली. वर्षभरापासून विद्यार्थ्यांनी मानसिकता टिकविणे कठीण आहे. लाॅकडाऊन असूनही गरीब विद्यार्थी स्वबळावर उभे राहून शहरात येऊन शिक्षण घेत आहे. ऑफलाइन शक्य नसेल तर ऑनलाइन घ्या. पण परीक्षा लेट करू नका. हे आयोगाला शोभत नाही. 
-सचिन राऊत, परीक्षार्थी, यवतमाळ
परीक्षा रद्द करण्याचा सरकारचा हा प्रकार अत्यंत दुखद आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य निर्माण केले जात आहे. विद्यार्थी अनेक वर्षांपासून तयारी करीत आहे. यातून आत्महत्येचे प्रकारही घडू शकतात. यवतमाळमध्ये पूर्णवेळ अभ्यास करणारे बरेच आहे. ते परीक्षेची चातकासारखी वाट पाहात होते. वय झाल्याने त्यांना दुसरे कामही करता येत नाही. 
- सुकेश काजळे, परीक्षार्थी, घाटंजी
केंद्र सरकारतर्फे बऱ्याच परीक्षा घेण्यात येत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही परीक्षा व्हायलाच पाहिजे. विशेष म्हणजे इथेही इतर परीक्षा होत आहेत. मग एमपीएससीची परीक्षा घेण्यात अडचण होती, असे म्हणणे योग्य नाही. आता या निर्णयाचा विपरीत परिणाम दहावी आणि बारावीच्या परीक्षेवर होणार आहे. कारण पालक म्हणतील, तरुणांना धोका आहे तर आमच्या मुलांना कोरोनाचा धोका नाही का?
- कुलदीप चौधरी, परीक्षार्थी, यवतमाळ
परीक्षा दोन दिवसांवर आलेली असताना ती रद्द करणे दुर्दैवी आहे. यापूर्वी पाच वेळा परीक्षा पुढे ढकलली गेली. यातून उमेदवारांची मानसिकता बिघडण्याची आणि बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे. २०१४ पासून परीक्षा होत नसल्याने अनेक जणांचे वय व संधीही निघून गेली. आता अनेकांना घरून रोजगारासाठी, लग्नासाठी दबाव वाढत आहे. शेतकऱ्यांना नापिकी झालेली असतानाही महिना पाच हजार रुपये खर्च करून त्यांची मुले एमपीएससीची तयारी करीत आहे,          - गजानन मोळोदे, परीक्षार्थी कळंब

 

Web Title: Elections are held, marriages are held, then why not exams?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.