कुशल कारागिरांची वाणवा : कामाप्रती वाढतेय उदासीनतारूपेश उत्तरवार यवतमाळ जिल्ह्याची लोकसंख्या वाढत असली तरी, कामासाठी लागणारे हात अपुरे आहेत. शासनदरबारी आठ लाख मजुरांची नोंद असताना कामावर केवळ पाच लाख मजूर राबत आहे. त्यातही कुशल कारागिरांचा तुटवडा आहे. श्रमाला प्रतिष्ठा देणारा वर्ग कमी झाल्याचा हा परिणाम मानला जात आहे. कामाप्रती असलेली उदासीनता यानिमित्ताने पुढे आली आहे.प्राचीन ग्रंथात व्यक्तींच्या चांगल्या कर्मासाठी त्याचे हात महत्वाचे असल्याचे म्हटले आहे. याकरिता एक संस्कृत सुभाषित प्रचलित आहे. ‘कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, क रमुले तु गोविंद:, प्रभाते कर दर्शनम्’. याचा अर्थ आपल्याला लक्ष्मीची म्हणजेच पैशाची प्राप्ती व्हावी म्हणून कुठल्याही तंत्र, मंत्र अथवा आराधनेची आवश्यकता नाही. आपल्या दोन हातांनी काम केले तर, दोन पैसे नक्की मिळतील. विद्या प्राप्त करायची असेल तर हाताने पुस्तके वाचली पाहिजे. यासाठी प्रत्यक्ष काम करण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महराजांनी कष्टकऱ्यांना ग्रामगीता अर्पण केली. आपल्या भजनात कामातच राम असल्याचे सुतोवाच करीत काम करण्याचा संदेश प्रत्येकांना दिला.मात्र कामात राम शोधणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे. आजची पिढी शिक्षित आहे. मात्र ती दोन पैसे कमविण्यासाठी नोकरीच्या मागे धावत आहे. स्वत:च्या पायावर उभे राहून व्यवसाय उभारण्यासाठी ते तयार नाही. द्विधा मनस्थितीत असलेल्या या युवकांना बँका कर्ज द्यायला तयार नाही. स्थानिक कामगारांच्या बाबतीत हे चित्र अधिक आहे. रोजगार हमी योजनेत १०० दिवसांचा रोजगार पक्का आहे. रोजगार न मिळाल्यास हप्ता देण्याची हमी होती. यामुळे जिल्ह्यात आठ लाख ९२ हजार २५७ लोकांनी काम हवे आहे म्हणून जॉबकार्ड काढले. प्रत्यक्षात उपलब्ध झालेल्या ४६ हजार कामावर जाण्यासाठी मजूर तयार नाहीत. केवळ योजनेचा लाभ लाटण्यासाठी या नोंदी झाल्या असाव्या असाही अर्थ यातून काढला जात आहे. रोहयोमध्ये सेल्फवरची कामे उपलब्ध आहेत. त्याची मजूरीही चांगली आहे. यानंतरही मजूर कामावर जात नाही. सध्या चार हजार ३१३ मजूर काम करीत आहे. उन्हाळयात हा आकडा दोन लाखांपर्यंत पोहोचतो. मात्र सहा लाख मजूर समोरच येत नाही.
नोंद आठ लाख मजुरांची, कामावर केवळ पाच हजार
By admin | Updated: September 22, 2016 01:31 IST