‘विजस’चा आरोप : शासनाने ग्राहकांची लूट थांबविण्याची मागणीयवतमाळ : शेतकऱ्यांपासून कवडीमोल भावात तूर विकत घेतल्यानंतर आता मात्र साठेबाजी करून तूर व इतर डाळींचे भाव वाढविण्यात आले आहे. यातून सर्वसामान्यांची लूट सुरू असून शासनाने ती त्वरित थांबविण्यासाठी कठोर पाडले उचलावीत अशी मागणी, विदर्भ जनआंदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी केली आहे. मागील जानेवारी ते मार्चमध्ये शेतकऱ्यांनी आपली तूर जेमतेम ५ हजार रुपये भावात विकल्यानंतर आता तुरीचे भाव सात ते आठ हजारांवर जात असून महिन्यापूर्वी किरकोळ दर ७५ ते ८० रुपये असलेली तूर डाळ आता थेट १०५ रुपयांवर पोहोचली आहे. या प्रचंड दरवाढीच्या फटका ग्राहकांना सोसावा लागत असून डाळ गरिबांच्या ताटातून गायब झाली आहे. मागील दहा दिवसात साठेबाजी करणाऱ्या मुठभर व्यापाऱ्यांनी कृत्रिमपणे ही प्रचंड वाढ सर्वच डाळींमध्ये केली आहे. सरकारने शेतकऱ्यांची मंदीच्या नावावर पडेल किंमतीमध्ये सारी तूर विकत घेऊन आता मार्चमध्ये कोसळलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याचे कारण समोर करून तूर, चणा, वाटाणा, मसूर, मूग आदीच्या दरात बाजारात अचानकपणे झालेली वाढ व्यापारी कटाचा भाग असून सरकारने गरिबांची व जनतेची लूट थांबविण्यासाठी साठेबाजारी करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी व गरिबांना सार्वजनिक वितरण प्रणालीमधून तूर डाळीचे वाटप ४० रुपयांप्रमाणे सुरु करावी, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे. (प्रतिनिधी)किरकोळ दर आणखी वाढण्याची शक्यतामागील महिन्याच्या शेवटी बाजारात तूर डाळ दजार्नुसार प्रति क्विंटल ८ हजार २०० ते ९ हजार ५०० रुपयांपर्यंत होती. आता मात्र किरकोळ दर १०० रुपयांवर पोहोचल्याने गरीब, मध्यमवर्गियांनी तूर डाळीची खरेदी थांबविली आहे. त्याऐवजी वाटाणा डाळ आणि लाखोळी डाळीची खरेदी वाढविली आहे. ठोकमध्ये वाटाणा डाळ प्रति क्विंटल ३ हजार ते साडेतीन हजार रुपये, बटरी डाळ ४ हजार दोनशे ते साडेचार हजार रुपये आणि लाखोळी डाळ ३ हजार १०० ते ३ हजार ३५० रुपये आहे. या डाळींना मागणी वाढल्याने यांच्या किंमतीमध्येही दररोज वाढ होत आहे. सरकारने वेळीच कारवाई न केल्यास या दरांमध्ये आणखी वाढ होण्याची भिती किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे.
साठेबाजींमुळे डाळींचे दर भिडले गगनाला
By admin | Updated: May 8, 2015 23:57 IST