पांढरकवडा : वडिलांशी वाद घालून त्यांच्या मुलीला दगड फेकून मारून दात पाडल्याचा दोष सिद्ध झाल्याने एका आरोपीला सहा महिने सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. या खटल्याचा निकाल येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी हितेंद्र वाणी यांच्या न्यायालयाने शुक्रवारी दिला. विलास संभाजी पाटील (४४) रा. धारणा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तालुक्यातील धारणा येथे २७ जानेवारीला एक मुलगी आपल्या आई सोबत बोलत होती. यावेळी विलास पाटील तेथे आला. त्याने मुलीच्या वडिलांशी क्षुल्लक कारणावरून वाद घातला. त्यानंतर संतापाच्या भरात त्याने दगड भिरकावला. हा दगड मुलीच्या तोंडाला लागून ती गंभीर जखमी झाली. तसेच तिचा दात पडून अपंगत्व आले. घटनेनंतर या प्रकरणी सदर मुलीने पांढरकवडा पोलिसात तक्रार दिली. त्यावरून विलास पाटील याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. तपासादरम्यान पुरावे गोळा करून प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले. हा खटला येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी हितेंद्र वाणी यांच्या न्यायालयापुढे चालला. सुनावणी दरम्यान पाच साक्षी तपासण्यात आल्या. त्यामध्ये सदर मुलगी आणि तिच्या वडिलांची साक्ष महत्वाची ठरुन दोष सिद्ध झाला. त्यावरुन न्यायालयाने आरोपी विलास पाटील याला शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्यावतीने सहायक सरकारी वकील अॅड. राजकुमार गुप्ता यांनी युक्तीवाद केला. (शहर प्रतिनिधी)
दात पाडणाऱ्यास सहा महिने शिक्षा
By admin | Updated: January 3, 2015 02:06 IST