वणी : जातीय द्वेषापोटी आदिवासी मंत्री व आमदारांचे पुतळे दहन करून समाजात अस्थिरता निर्माण करू पाहणाऱ्या धनगर समाजातील पुढाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी आदिवासी बांधवांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे़आर्थिक हलाखीच्या निकषावर घटकाला आरक्षण देण्याची तरतूद संविधानात नाही. संविधानातील अनुच्छेद १५, १६ व १७ च्या तरतुदीनुसार सामाजिक, शैक्षणिक मागासलेपणा, प्रशासन अनुसूचित जाती-जमातीला अपर्याप्त प्रतिनिधीत्व, या निकषांवर आरक्षण देण्याची तरतूद संविधात आहे़ धनगर समाज हा आदिवासींच्या कोणत्याही जीवन क्रमाचा भाग नसून त्यांना आदिवासींचे आरक्षण देणे, हे न्याय संगत नाही. ते संविधानाच्या विरोधी होईल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. धनगर समाज हा कोणत्याही अंगाने अनुसूचित जमातीत मोडत नसून त्यांची सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक संरचना व जीवन पध्दती अनुसूचित जमातीशी न जुळणारी असल्याने त्यांना अनुसूचित जमातीच्या आरक्षणात समाविष्ट करून घेणे हे संविधान विरोधी कृती आहे़ अशा अनुचित प्रकाराला विरोध करणाऱ्या आदिवासी आमदार व मंत्री शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, मधुकर पीचड यांच्या पुतळ्याचे ठिकठिकाणी दहन करण्यात येत आहे. याचा आदिवासी बांधवांनी निषेध केला आहे. धनगर समाजाच्या या बेकायदेशीर व न्याय संगत नसणाऱ्या कृतीमुळे या दोन समाजात तडे निर्माण होऊन सामाजिक अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे धनगर समाजातील पुढाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अन्यथा आदिवासी जमातींना अशा असामाजिक तत्वाविरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशारा निवेदनातून आदिवासी बांधवांनी दिला आहे़ (कार्यालय प्रतिनिधी)
पुढाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
By admin | Updated: June 21, 2014 02:11 IST