यवतमाळ : येथील काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रवीण दिवटे यांच्या खुनातील आरोपींपैकी काहींना नागपूर तर काहींना अमरावती मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले आहे. २७ नोव्हेंबरला होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ही खबरदारी घेतल्याचे सांगितले जाते. प्रवीण दिवटे यांच्या खुनात आतापर्यंत १४ ते १५ आरोपी गजाआड झाले आहेत. त्यांना यवतमाळ जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले. मात्र यातील म्होरक्याचा यवतमाळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत हस्तक्षेप होण्याची व आतून सूत्रे हलविले जाण्याची शक्यता पाहता या सर्वच आरोपींना यवतमाळातून हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार काहींना नागपुरात तर काहींना अमरावती कारागृहात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. मात्र तो आपली सुटका करून घेण्यासाठी परस्परच प्रयत्न करीत असल्याची माहिती आहे.दोन प्रकरणात ‘डिलिंग’ची चर्चा यवतमाळ व वडकीतील दोन प्रकरणात पोलिसांच्या स्तरावर ‘डिलिंग’ची चर्चा आहे. यवतमाळातील एक प्रकरण कथित रिव्हॉल्वर जप्तीचे आहे. तर दुसरे पांढरकवडा येथील पथकाने दिवाळीच्या दोन दिवसापूर्वी वडकी ठाणे हद्दीतील खैरी येथे जुगारावर घातलेल्या धाडीचे पण नंतर ती रफादफा केल्याचे आहे. या धाडीत नेमकी किती रक्कम सापडली याचे आकडे पोलीस दलात चर्चिले जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी) दोघांना ‘रिलॅक्स’ करण्यासाठी राजकीय दबावप्रवीण दिवटेच्या खुनाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून काढून घेऊन यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना ‘रिलॅक्स’ करावे यासाठी राजकीय स्तरावरून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा पोलीस दलात आहे. या दोन पैकी एक आरोपी कारागृहात तर दुसरा फरार आहे. याच ‘रिलॅक्स’च्या प्रस्तावाला प्रतिसाद न मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेकडून हा तपास काढून घेण्यात आल्याचे सांगितले जाते. ‘रिलॅक्स’साठी असलेल्या राजकीय दबावाला यवतमाळचे एसडीपीओ कार्यालय प्रतिसाद देते की, एलसीबीप्रमाणेच ‘मोडेल पण वाकणार नाही’ अशी भूमिका घेऊन प्रस्ताव फेटाळते याकडे नजरा लागल्या आहेत. हैदराबादचा आश्रयदाता मोकळा कसा ?प्रवीण दिवटेच्या खुनातील आरोपींनी हैदराबादमधील एका कंत्राटदार अण्णाच्या मुलाकडे अनेक दिवस आश्रय घेतला होता. या आश्रयदात्याला दोन पोलीस अधिकाऱ्यांनी हैदराबादवरून चौकशीसाठी आणले होते. मात्र त्याला या अधिकाऱ्यांच्या ‘नेक्स्ट’ वरिष्ठांनी ‘रिलिफ’ दिल्याने नंतर या दोघांनी या तपासातील इन्टरेस्ट काढून टाकला. त्यामुळे अनेक दिवस हा तपास जणू थंडबस्त्यात पडला होता. या आश्रयदात्या मुलाचा पिता अण्णा यवतमाळातील एका मोठ्या कंत्राटदाराच्या सतत संपर्कात राहत असल्याचेही सांगितले जाते.
दिवटेच्या मारेकऱ्यांना नागपूर, अमरावती कारागृहात हलविले
By admin | Updated: November 17, 2016 01:19 IST