ढाणकी (यवतमाळ) : येथील गुंडेकर कोचिंग क्लासेसच्या संचालक शिक्षकाने एका १६ वर्षीय विद्यार्थिनीला आमिष देऊन शारीरिक संबंध ठेवले. यात ती चार महिन्याची गर्भवती राहिली. त्यानंतर शिक्षकाने विद्यार्थीनीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. गोळ्यांचा डोस अती झाल्याने तिची प्रकृती खालावली. पिडीतेचा नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना साेमवारी २२ सप्टेंबर राेजी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर बिटरगाव पाेलिसांनी शिक्षकाला अटक केली.
संदेश गुंडेकर (२७) रा. ढाणकी असे अटक झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. त्याचे मागील तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत अनैतिक संबंध होते. या संबंधातून ती विद्यार्थिनी गर्भवती राहिली होती. चार महिन्यांचा गर्भ असताना गुंडेकर याने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. गोळ्यांच्या अती-डोसमुळे विद्यार्थिनीला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. तिची प्रकृती बिघडल्यानंतर तिला उपचारासाठी पुसद येथील लाईफ लाईन या खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हे गर्भपाताचे प्रकरण असल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ पुसद येथील सहायक पोलीस निरीक्षक प्रेम केदार याना घटनेची माहिती दिली. पुसद शहर पोलिसांनी तातडीने रुग्णालयात येऊन पिडीत मुलीचा जबाब घेवून शिक्षकाविराेधात रविवारी रात्री ११ वाजता २०११,२०२५ कलम ६४(२)(एफ)(आय)(एम)भारतीय न्यायसंहिता सहकलम ४,६ पाॅक्साे आंतर्गत गुन्हा नोंद केला. पिडीतेची प्रकृती गंभीर असल्याने तिला तेथून नांदेड येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले. तिथे तिचा साेमवारी सकाळी मृत्यू झाला.
पुसद पाेलिसांनी अल्पवयीन विद्यार्थीनीवरील अत्याचाराचा गुन्हा साेमवारी बिटरगाव पोलिसांकडे वर्ग केला. बिटरगाव पोलिसांनी तात्काळ आरोपी संदेश गुंडेकर याला भोकर जि. नांदेड येथून अटक केली. पुढील तपास ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सागर अन्नमवार करत आहेत. या घटनेने ढाणकी शहरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. त्या शिक्षाकाचा निषेध केला जात आहे.