यवतमाळ : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मुलाचा चक्क आईने व प्रियकराने मिळून खून केला. या गुन्ह्यात फिर्यादी असलेली आईच दाेषी निघाली, तर प्रत्यक्षदर्शी साक्षीदारसुद्धा फितूर झाला. त्यानंतरही परिस्थितीजन्य पुराव्यावरून न्यायालयात आराेपींनी खून केल्याचे सिद्ध झाले. पहिले अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. यु. बघेले यांनी दाेन्ही आराेपींना जन्मठेपेची शिक्षा ठाेठावली. फितूर झालेल्या साक्षीदाराला कारणे दाखवा नाेटीस बजावण्याचा आदेश दिला.
नरेंद्र ज्ञानेश्वर ढेंगळे (वय ४५), शाेभा दगडू चव्हाण (५०, दाेघेही रा. माेझर, ता. नेर) अशी आराेपींची नावे आहेत. त्यांचे अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध हाेते. घटनेच्या दिवशी ३ ऑगस्ट २०२० राेजी ते दोघेही शाेभाच्या घरात हाेते. दरम्यान, शाेभाचा मुलगा कमल दगडू चव्हाण (३०) हा तिथे पाेहाेचला. दाेघांना नकाे त्या अवस्थेत बघितले, गावात बदनामी हाेणार या भीतीतून दाेघांनी लाेखंडी सराट्याने वार करून कमल याचा खून केला. नंतर त्याचा मृतदेह गावातील स्मशानभूमीत फेकून दिला. दुसऱ्या दिवशी शाेभानेच अज्ञात आराेपीविराेधात मुलाचा खून केल्याची तक्रार दिली.
नेर ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे यांनी अज्ञात व्यक्तीविराेधात कलम ३०२, ३४ भा.दं.वि.प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान, पाेलिसांना या घटनेचा प्रत्यक्षदर्शी मिळाला. त्यावरून शाेभा व तिचा प्रियकर नरेंद्र या दाेघांना पाेलिसांनी ताब्यात घेऊन चाैकशी केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यानेच कमलचा खून केल्याचे पाेेलिसांना सांगितले. त्यानंतर पाेलिसांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पंकज कावरे व कमल याची पत्नी या दाेघांचेही कलम १६४ नुसार बयाण नाेंदविले. ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे व ठाणेदार प्रशांत मसराम यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले.
न्यायालयात युक्तिवाद सुरू असताना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पंकज कावरे हा फितूर झाला. मात्र, सरकारी वकील ॲड. मंगेश गंगलवार यांनी न्यायालयापुढे परिस्थितीजन्य पुरावे, डाॅक्टरांचा अहवाल, इतर साक्षीदार उभे करून त्या दाेघांनीच गुन्हा केल्याचे सिद्ध केले.
न्यायालयाने दाेन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आराेपींना शिक्षा ठाेठावली. आराेपी नरेंद्र व शाेभा यांना कलम ३०२, ३४ नुसार आजन्म कारवासाची शिक्षा ठाेठावली. नरेंद्र ढेंगळे याला ५० हजार रुपये दंड, शाेभा चव्हाण हिला १० हजार रुपये दंड केला. ही रक्कम मृत कमल चव्हाण याची पत्नी व तीन मुलींना नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश केला. या खटल्यात सहकारी वकील मंगेश गंगलवार यांना काेर्ट पैरवी अधिकारी म्हणून महेंद्र चरणदास भाेवते यांनी सहकार्य केले.
फितूर साक्षीदार अडचणीत
पाेलिसांनी १६४ अंतर्गत बयाण घेतल्यानंतरही ऐनवेळी न्यायालयात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पंकज कावरे याने त्याचे बयाण फिरवले. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास येताच न्यायालयाने कावरे यास कारणे दाखवा नाेटीस बजावण्याचे निर्देश दिले.