लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चारचाकी वाहन विकल्यानंतर नवीन मालकाच्या नावे नोंदणी न केल्यामुळे मूळ मालकास वाहतूक नियम उल्लंघनाचा दंड भरावा लागल्याची घटना घडली. या प्रकरणात यवतमाळ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत, एकूण १५ हजार रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
यवतमाळ येथील किरण प्रभाकरराव शेळके यांच्या चारचाकी वाहनाला अपघात झाला. त्यांनी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीकडून वाहनाचा विमा काढला होता. दुरुस्तीनंतर कंपनीने वाहन ताब्यात घेऊन पुणे येथील एका व्यक्तीला विकले. मात्र, मालक बदलविला नाही. त्यामुळे नियमाचे उल्लंघन केल्याचा आरटीओ विभागाचा संदेश किरण शेळके यांना आला. त्यांनी आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीकडे ही बाब सांगितली. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात धाव घेतली.
अडचणीत आणण्याचा प्रयत्नइन्शुरन्स कंपनीने किरण शेळके यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचे वाहन खरेदीदाराच्या नावावर करण्यात चालढकल करण्यात आली. हा प्रकार अडचणीत आणण्याचा प्रयत्न असल्याचे आयोगाने निकालपत्रात म्हटले आहे. आयोगाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र उल्हास मराठे आणि सदस्य अमृता वैद्य यांच्या उपस्थितीत या प्रकरणावर सुनावणी झाली.
सात वर्षानंतर निकालकिरण शेळके यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाकडे १३ एप्रिल २०१८ या दिवशी प्रकरण दाखल केले होते. ३० जून २०२५ रोजी या प्रकरणाचा निकाल देण्यात आला. आयोगाच्या निर्णयामुळे विकलेले वाहन नवीन मालकाच्या नावावर करण्यास लोक प्रवृत्त होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नोंदणी रद्द करालोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला, ग्राहक म्हणून सेवा देण्यात कसूर सोडला. शेळके यांच्याकडून ताब्यात घेण्यात आलेल्या वाहनाचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी घ्यावी किंवा नोंदणी रद्द करावी, असे आदेशात म्हटले आहे.शारीरिक व मानसिक त्रासापोटी दहा हजार आणि तक्रार खर्चाचे पाच हजार रुपये द्यावे, असा आदेश देण्यात आला आहे.