पोटनिवडणूक : वर्ष लोटूनही परिस्थिती ‘जैसे थे’, नेते-कार्यकर्ते घरातच यवतमाळ : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, विद्यमान जिल्हाध्यक्ष यांच्या बालेकिल्ल्यातच काँग्रेसला पोटनिवडणुकीतसुद्धा धोबीपछाड दिला गेला. केंद्रात व राज्यात भाजपाची सरकारे येऊन वर्ष-दीड वर्ष लोटल्यानंतरही मतदारांमधील काँग्रेसप्रती असलेली नाराजी अद्याप दूर झाली नसल्याचे या निकालांनी स्पष्ट केले. झरी तालुक्यातील मुकुटबन पंचायत समिती गणासाठी आणि नेर-नबाबपूर नगर परिषदेच्या प्रभाग क्र. १ मधील एका जागेसाठी ही पोटनिवडणूक नुकतीच पार पडली. या दोनही जागांचे निकाल काँग्रेस नेत्यांना पुन्हा आत्मचिंतन करायला लावणारे आहे. मुकुटबन हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा तर नेर हा काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष व विद्यमान विधान परिषद सदस्याचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र आपल्या राजकीय गृहतालुक्यातही या नेत्यांना पक्षाची प्रतिष्ठा राखता आलेली नाही. मुकुटबनमध्ये काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. तेथे भाजपाचा उमेदवार विजयी झाला. शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली. नेरमध्ये तर शिवसेनेच्या विजयाच्या खात्री ने की काय काँग्रेसने चक्क उमेदवारच रिंगणात उतरविला नाही. उलट भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन सेनेचा पराभव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसनेही तीच भूमिका ठेवली. मात्र भाजपा-काँग्रेस-राष्ट्रवादी एकसंघ झाल्यानंतरही तेथे सेनेच्या उमेदवाराला पराभूत करता आलेले नाही. पोटनिवडणुकीसाठी उमेदवारच उभा केला जाऊ नये, एवढी वाईट अवस्था काँग्रेसवर आली काय, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. दीड वर्षांपूर्वी लोकसभेत तर वर्षभरापूर्वी विधानसभेत काँग्रेसने सपाटून मार खाल्ला. या पराभवातून धडा घेऊन काँग्रेस आता संघटनात्मक बांधणीवर भर देईल, लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेईल, त्या सोडविण्यासाठी नेते रस्त्यावर उतरतील असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र प्रत्यक्षात आजही पराभूत झालेली नेते मंडळी घरातच बसून आहे. नेतेच रस्त्यावर नसल्याने कार्यकर्तेही आपआपल्या घरात आहेत. त्यांना घराबाहेर काढून पुन्हा पक्षात सक्रिय करण्याची कोणत्याही नेत्याची मानसिकता नाही. सार्वत्रिक निवडणूक ते पोटनिवडणूक या काळात काँग्रेसवरील मरगळ कायम असल्याचे चित्र आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
काँग्रेसला पुन्हा धोबीपछाड
By admin | Updated: January 14, 2016 03:06 IST