उत्तम इंग्रजी अध्यापनासाठी चेस प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 12:11 AM2019-02-09T00:11:26+5:302019-02-09T00:12:44+5:30
खासगी शाळांच्या तुलनेत शासकीय शाळांमधील विद्यार्थी इंग्रजी विषयात कमी पडतात. भविष्यात ही उणीव राहू नये याकरिता चेस प्रकल्प राज्यात राबविला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थी जागतिक दर्जाचा घडावा याकरिता विशेष प्रयत्न केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खासगी शाळांच्या तुलनेत शासकीय शाळांमधील विद्यार्थी इंग्रजी विषयात कमी पडतात. भविष्यात ही उणीव राहू नये याकरिता चेस प्रकल्प राज्यात राबविला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थी जागतिक दर्जाचा घडावा याकरिता विशेष प्रयत्न केले जाणार आहे. इंग्लिश टिचर फोरम स्थापन करण्यात आले. यात जिल्ह्यातील १६० इंग्रजी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
राज्य शासनाने नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या इंग्रजी शिक्षणावर विशेष भर दिला आहे. त्याकरिता समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून २०१७ ते २०२० या कालावधीत चेस प्रकल्प राबविला जाणार आहे. शिक्षकांच्या समोरासमोर आणि आॅनलाईन बैठकाही घेण्यात आल्या आहेत. यामध्ये नवीन अध्यापन पद्धती आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामध्ये विविध शैक्षणिक संकेतस्थळांची माहिती दिली जाणार आहे. नवीन तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडचा वापर केला जाणार आहे. यातून शिक्षकामध्ये आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययन कौशल्यात आमूलाग्र बदल पाहायला मिळणार आहे.
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या माध्यमातून या विषयाची कार्यशाळा यवतमाळात नुकतीच पार पडली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. संजय तामगाडगे, शिवाजी कुचे, इंग्रजी विभागप्रमुख डॉ. रमेश राऊत, संग्राम दहीफळे, वैभव जगताप, १६ ब्लॉकचे मॉडरेटर, तालुका विषय साधनव्यक्ती उपस्थित होते.