मारेगावात काँग्रेस-शिवसेनेत बंडखोरी : ‘बंडोबां’मुळे निवडणुकीत चुरस वाढली, झरीत चौरंगी लढतीची शक्यता मारेगाव : ‘कामाला लागा’चे आश्वासन देऊनही ऐनवेळी दुसऱ्यालाच पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज दिल्याने प्रचंड नाराज झालेल्या ‘बंडोबां’नी पक्षाच्या नेत्यांवर तोंडसुख घेत बंडाळी करून ऐनवेळी दुसऱ्या पक्षाची उमेदवारी घेत उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे गुरूवारी शेवटच्या दिवशी काही तासांत मारेगाव येथे सर्वच पक्षांचे समीकरण बदलले आहे. बंडोबांमुळे आता निवडणुकीतील चुरस प्रचंड वाढली आहे.गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय पक्षांसमोर उमेदवारी वाटपाचा घोळ सुरू होता. एकाच प्रभागात अनेक कार्यकर्ते इच्छुक असल्याने उमेदवार ठरविणे राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांसमोर डोकेदुखी ठरले होते. त्यांची एकप्रकारे अग्नीपरीक्षाच होती. त्यामुळे आत्ताच कुणाला नाराज करण्यापेक्षा सगळ्यांनाच कामाला लागण्याचे आदेश देऊन नेत्यांनी वेळ मारून नेण्याची भूमिका घेतली होती.गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्जासोबत पक्षाचा बी फार्म जोडणे आवश्यक असल्याने, राष्ट्रीय पक्षांना आपले उमेदवार जाहीर करावे लागले. उमेदवार जाहीर होताच शिवसेना व काँग्रेस, या दोन पक्षात मोठ्या प्रमाणात बंडाळी उफाळून आली आहे. अखेर नाराजांनी सोयीच्या पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळविली आहे. या बंडाळीचा लाभ मनसे व शिवसेनेला झाला. या पक्षांनी ऐनवेळी इतर पक्षांचे सक्षम उमेदवार मिळत असल्याने त्यांना तत्काळ पक्षात प्रवेश देत आपल्या पक्षाची उमेदवारी बहाल केली आहे.काँग्रेसकडे उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांची मोठी संख्या होती. नेत्यांच्या अवती-भवती फिरणाऱ्या आणि पक्षाचे निष्ठावंत समजल्या जाणाऱ्या या सिनीअर कार्यकर्त्यांना ‘धोबीपछाड’ देत काँग्रेसच्या नेत्यांनी विजयी होणाऱ्या उमेदवारांना पसंती दर्शविली. त्यामुळे काँग्रेसच्या काही कायकर्त्यांचा हिरमोड झाला. काँग्रेसने जुन्या कार्यकर्त्यांपैकी उदय रायपूरे व खालीद पटेल यांना मात्र उमेदवारी देऊन त्यांच्यावर विश्वास दाखविला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि मनसेसोबतच आता अपक्षांची कसोटी लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)
शेवटच्या क्षणी बदलले उमेदवारांनी पक्ष
By admin | Updated: October 10, 2015 02:03 IST