यवतमाळ : आपले ध्येय निश्चित करा, त्यासाठी कठोर परिश्रमाची तयारी ठेवा. त्यामुळे यश निश्चित पदरात पडेल. यातून तुम्हाला नाव कमावता येईल. परंतु या सोबतच माणसं जोडता आली पाहिजे, असे प्रतिपादन यवतमाळची लेक, मिस हेरिटेज इंटरनॅशनलची उपविजेती आणि मराठी चित्रपट अभिनेत्री शीतल उपरे यांनी केले. आगामी चित्रपट ‘आयपीएल’ (इंडियन प्रेमाचा लफडा) या चित्रपटाच्या प्रसिद्धी व प्रचारासाठी यवतमाळात आली असता ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली, त्यावेळी ती बोलत होती. सुरूवातीला लोकमत जिल्हा कार्यालयप्रमुख किशोर दर्डा यांनी शीतल उपरे हिचे स्वागत केले. यवतमाळच्या शालेय जीवनापासून ते मराठी चित्रपटापर्यंतचा प्रवास तिने यावेळी उलगडून दाखविला. अगदी सर्वसामान्य कुटुंबातील शीतलने ध्येयावर निष्ठा ठेवत आज गगनभरारी घेतली आहे. यवतमाळच्या गव्हर्नमेंट हायस्कूल आणि अमोलकचंद महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या शीतलने नागपुरातून क्रिमीनल सायकॉलॉजी या विषयात पदवी घेतली. यासोबतच ती अभिनय क्षेत्रातही तेवढ्याच ताकदीने उतरली होती. स्थानिक वृत्तवाहिनीची अँकर आणि यवतमाळ आयडॉलमध्ये कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिच्यात आत्मविश्वास निर्माण करून गेले. गिरीष कर्नाड यांच्या पाषाण नाटकातील तिच्या अभिनयाला उत्कृष्ट राज्य पुरस्कार मिळाला. लघुचित्रपट ‘तारा द लॉक’ मधील तिची भूमिका पुरस्कार देऊन गेली. नाट्यक्षेत्रात दमदार पाऊले उचलत असताना तिने आपले करीअर हवाईसुंदरी म्हणून सुरू केले. सिंगापूर एअरलाईन्स या अत्यंत प्रतिष्ठेच्या विमानसेवेत ती रुजू झाली. मात्र आपले यात मन लागत नव्हते, आपले स्वप्न वेगळे होते. मिस वर्ल्ड होण्याचे आपले स्वप्न असल्याने मी मुंबईत परत आल्याचे शीतल सांगते. याच दरम्यान तिला यंदाचा नेपाळ मिस हेरीटेज हा पुरस्कार मिळाला. यासोबतच ती आयपीएल या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकत आहे. २६ डिसेंबर रोजी प्रदर्शीत होणारा हा चित्रपट शीतलचा पहिला आहे. माझ्या मित्रांनी आणि आईने प्रोत्साहन दिल्यानेच मला हे यश मिळविता आले. मी माझ्या चित्रपटाच्या करिअरला मराठीतून सुरूवात केली, हा मराठीसाठी माझा मानाचा मुजरा असल्याचे तिने सांगितले. चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक कदम यांनी आयपीएल चित्रपटाच्या निर्मितीची कथा सांगितली. मराठी चित्रपट मार्केटींगमुळे मागे पडत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी चित्रपट निर्माता मुश्ताक अली, आयपीएल चित्रपटाचा नायक स्वप्नील जोशी, शीतलची आई सुजाता उपरे आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
नाव कमावता येते, मात्र माणसं जोडता आली पाहिजे
By admin | Updated: December 18, 2014 02:24 IST