लोकमत न्यूज नेटवर्कजवळा : आर्णी तालुक्यातील जवळा येथे राज्य महामार्गावर बस व आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात बस चालकासह तीन प्रवासी जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.दारव्हा आगाराची एसटी बस (एमएच ४० एन ८०७) जवळामार्गे आर्णी येथे जात होती. सकाळी १० वाजेच्या सुमारास ही बस जवळा बसस्थानकात पोहोचली. प्रवाशांची चढ-उतार करून बस आर्णीकडे निघाली. मात्र, दारव्हा फाटा व जवळा जिनिंगजवळ सर्व्हिस रोडवरून महामार्गावर जाण्यास रस्ता दुभाजक नसल्याने चालकाला बस विरुद्ध दिशेने घ्यावी लागते. जवळासमोर एक किलोमीटर अंतरावर किन्ही फाट्याजवळ रस्ता दुभाजक आहे. तेथे चालक बस वळवत असताना अचानक आर्णीकडून यवतमाळकडे डाळिंब घेऊन जाणाऱ्या सुसाट आयशर ट्रकने (एमएच ४५ एएफ ४२७३) बसला धडक दिली.या अपघातात बसचालक रमेश रामचंद्र बुचके (५०) रा. पाभळ गंभीर जखमी झाले. तसेच बसमधील २१ प्रवाशांपैकी तीन प्रवासी गंभीर जखमी झाले. ट्रकचालक अजित महादेव बानारे (३२) रा. कदमवाडी, ता. मिरज सांगलीवरून नागपूरला डाळिंब घेऊन जात होता. अपघातानंतर जवळा गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना ग्रामीण रुग्णालय आर्णी येथे हलविण्यात आले. आर्णी पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. एपीआय शिवराज पवार, एएसआय मनोहर पवार, जमादार अरुण चव्हाण तपास करीत आहेत.
जवळा येथे बस-ट्रकची धडक, बसचालक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 05:00 IST