वणी : तालुक्यातील राजूर (कॉलरी) येथील यशवंत पाटील यांनी यवतमाळ व वणी येथील हिमालय बजाज शोरूममध्ये दुचाकी बुकिंग केली होती. पाटील यांनी पूर्ण पैसे भरूनही दुचाकी न दिल्यामुळे त्यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार केली. निकालात ग्राहक मंचाने यवतमाळ व वणी येथील हिमालय बजाज शोरूमला दणका दिला आहे.यवतमाळ व वणी येथील हिमालय बजाज शोरूममध्ये यशवंत पाटील यांनी १६ जून २०११ रोजी दुचाकी बुक केली. त्यावेळी वाहनाची संपूर्ण किंमत, इन्शुरन्स चार्जेस, नोंदणी खर्च व इतर खर्च असे एकूण ५३ हजार ६०० रूपये त्यांनी येथील शोरूममध्ये जमा करून पावती घेतली होती. वाहन येण्यास विलंब लागत असल्याचे त्यावेळी शोरूमतर्फे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी एक महिन्याची वाट बघून वाहन आले किंवा नाही याबाबत विचारणा केली. तेव्हा वाहन उपलब्ध आहे, परंतु रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय वाहन देता येत नसल्याचे शोरूम व्यवस्थापकाने त्यांना सांगितले. वाहन बुक करून जवळपास तीन महिन्याचा कालावधी लोटला. त्यामुळे त्यांनी यवतमाळ येथील ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाकडे धाव घेतली. त्या तक्रारीची दखल घेत ग्राहक न्यायमंचाने दोन्ही बाजूची बयाणे घेऊन निकाल दिला. त्यात शोरूमने पाटील यांनी बुक केल्याप्रमाणे दुचाकी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून ३० दिवसाच्या आत नोंदणी करून इन्शुरन्स पॉलिसीसह देण्याचे आदेश दिले. ते शक्य नसेल तर, पाटील यांनी जमा केलेली रक्कम ५३ हजार ६०० रूपये १६ जून २०११ पासून द.सा.द.शे. ६ टक्के व्याजासह त्यांना परत द्यावी, त्यांना या काळात वाहनाचा उपभोग घेता आला नाही त्याकरिता पाच हजार रूपये तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी पाच हजार रूपये, तक्रार खर्च दोन हजार रूपये द्यावा, असे आदेश न्याय मंचाने दिले. (कार्यालय प्रतिनिधी)
ग्राहक मंचचा दणका
By admin | Updated: May 22, 2015 00:14 IST